पणजी- गोव्यातील तब्बल १९ वेगवेगळ्या जलमार्गांवर प्रवाशांची ने-आण करणाऱ्या फेरीबोटी हे येथे येणाऱ्या पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. पोर्तुगीज काळापासून येथे कार्यरत असलेल्या फेरीबोटींमध्ये वेगवेगळ्या चित्रपटांचे चित्रीकरणही झालेले आहे. गोव्याच्या नदी परिवहन खात्याला आता या जुनाट फेरीबोटींना रामराम ठोकून सौर ऊर्जेवर चालणाऱ्या नव्या अद्ययावत फेरीबोटी खरेदी करायच्या आहेत. त्यासाठी मंत्री सुदिन ढवळीकर येत्या १४-१५ रोजी केरळमध्ये कोची येथे भेट देणार आहेत.नदी परिवहनमंत्री ढवळीकर यांनी असे स्पष्ट केले की प्रायोगिक तत्त्वावर सौर ऊर्जेवरील फेरीबोटी चालविण्याचा विचार आहे.
लघू पल्ल्याच्या जलमार्गावर आधी हा प्रयोग घेतला जाईल. त्यामुळे फायदे आणि तोटे कळून येतील. या अद्ययावत फेरीबोटींना इंधनावर चालणारे बॅक अप इंजिनही असेल. सौर ऊर्जा न मिळाल्यास त्या इंधनावरही चालू शकतील. अलीकडेच पणजी- बेती जलमार्गावरील फेरीबोट भरकटून रुतली होती, तसे प्रकार घडू नयेत यासाठी खाते दक्ष आहे.
केरळमध्ये यशस्वी प्रयोग केरळमध्ये वायक्कोम ते थवनाक्कडवू दरम्यान सौर ऊर्जेवर चालणारी अद्ययावत फेरीबोट कार्यरत आहे. या अडीच किलोमिटरच्या जलमार्गावर गेल्या जानेवारीपासून ही फेरीबोट सुरु झालेली आहे.
नवाल्ड सोलार अॅण्ड इलेक्ट्रिक बोट कंपनीने ती डिझाइन करुन बांधली असून आदित्या कंपनी ती चालवत आहे. १५0 दिवसात तसेच पावसाळ्यातसुध्दा या फेरीबोटीबद्दल कोणतीही समस्या उद्भवलेली नाही. ५ किलोवॅटची ऊर्जा या फेरीबोटीसाठी लागते. अडीच किलोमिटरसाठी १५ मिनिटांचा प्रवास होतो. दिवसाकाठी २२ फेºया होतात आणि साधारपणे १६५0 प्रवाशांची रोज तेथे ने-आण होते, अशी माहिती मिळाली आहे.
‘नाकापेक्षा मोती जड’दरम्यान, सध्या अस्तित्त्वात असलेल्या आणि जुन्या झालेल्या फेरीबोटींचा दुरुस्ती खर्चही नदी परिवहन खात्यासाठी ‘नाकापेक्षा मोती जड’ असाच झालेला आहे. दोन वर्षांपूर्वी सहा फेरीबोटींच्या दुरुस्तीवर तब्बल २ कोटी रुपये खर्च करण्यात आला. प्रत्येकी ७0 लाख ७६ हजार रुपये खर्चून तीनेक वर्षांपूर्वी सरकारने दुहेरी इंजिनाच्या व आकाराने मोठ्या अशा ६ फेरीबोटी खरेदी केल्या. नदी परिवहन खात्याच्या ताफ्यात सध्या ३७ जुन्या फेरीबोटी आहेत. पैकी निम्म्या फेरीबोटींना किर्लोस्कर कंपनीची एअर कूल्ड इंजिने आहेत. किर्लोस्कर आणि ग्रीव्हज अशा दोन कंपन्यांची इंजिने फेरीबोटींसाठी वापरली जातात. गोव्याच्या नद्यांमधील पाणी उथळ असल्याने एअर कूल्ड इंजिनेच वापरली जातात. शिवाय नदीतील गाळ ही इंजिने शोषून घेत असतात, असे या क्षेत्रभातील एका तज्ञ अभियंत्याने सांगितले.
माजी आमदार तथा खाण उद्योजक दिवंगत अनिल साळगांवकर यांनी ३0 लाख रुपये खर्चून मोठी व जादा क्षमतेची फेरीबोट बांधून दिली होती काही दिवस ती गोव्यातील खाण भागातील एका जलमार्गावर चालली, परंतु सध्या ती बंद आहे. बंदर कप्तानांच्या परवानगीशिवाय कोणतीही फेरीबोट बांधता येत नाही तसेच जलमार्गावरही आणता येत नाही.
गोव्यातील फेरीबोटींमध्ये प्रवासी तसेच दुचाकींना तिकीट आकारले जात नाही. चारचाकी तसेच इतर वाहनांना तिकीट लागू आहे. सुमारे १९ जलमार्ग गोव्यात आहेत त्यातील पणजी- बेती, सांपेद्र-दिवाडी, जुने गोवे-दिवाडी, मडकई-दुर्भाट, रायबंदर-चोडण या जलमार्गांवर जास्त गर्दी असते आणि तुलनेत फेरीबोटींच्या जास्त फेऱ्या होतात.