पणजी: गोव्याच्या लोकसंख्येचा एक मोठा हिस्सा असलल्या गोमंतक भंडारी समाजात यापुढे राजकीय मुद्यांवरून फूट पडू देणार नाही, अशी घोषणा असे या समाजाचे नवनिवार्चित अध्यक्ष अशोक कृष्णा नाईक यांनी केली आहे. राजकीय मतभेद बाजूला सारून समाज एकसंध राखणे आणि समाजाचा विकास करणे हे उद्दिष्ट ठेऊन काम करणार असल्याचे त्यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
भंडारी समाजाच्या राज्य कार्यकारणीची निवडणूक नुकतीच पार पाडून अशोक नाईक हे या समाजाचे अध्यक्ष झाले. प्रबळ उमेदवार असलेले अनिल होबळे यांचा त्यांनी ७८ मतांनी पराभव केला. लोकमतशी संवाद साधताना ते म्हणाले की, समाज एकसंध राखणे हे ब्रीद राहील आणि सर्वांना सोबत घेऊन एकत्रपणे काम करणे हेच आपले तंत्र राहील. पक्षीय राजकारणाला बळी पडून समाजाचे विघटन होवू देणार नाही. समाजाच्या एका झालेल्या व्यापक बैठकीतही तसा निर्णय घेण्यात अला आहे. भाजपमध्ये असलेले केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, माजी आमदार दामू नाईक, दयानंद मांद्रेकरही आमचेच आहेत आणि काँग्रेसमध्ये असलेले आमदार रवी नाईकही आमचेच आहेत.
गोव्यात ४.५ लाख लोक हे भंडारी समाजाचे घटक आहेत. समाजातील लोकांची शीरगणती करण्याचे काम हाती घेण्यात येईल. त्यामुळे समाजासाठी विकासाचे उपक्रम हाती घेण्यासाठी ते सोयीचे होईल. विशेषत: शिक्षणाच्या बाबतीत या समाजाची जी प्रगती झालेली आहे ती पुरेशी नाही. विशेषत: मुलींच्या शिक्षणासाठी बरेच काही करण्यासारखे आहे. माझे कार्यकारणी सदस्य व समाजबांधवाच्या मदतीने सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले. गोव्याच्या १४.५ लाख लोकसंख्येत भंडारी समाजाचे प्रमाण हे २७ टक्क्यांहून अधिक आहे. गोव्याच्या राजकारणातही या समाजाची छाप आहे. या समाजाचे घटक असलेले श्रीपाद नाईक हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आयुश मंत्री आहेत. तसेच सध्या काँग्रेसचे आमदार असलेले रवी नाईक हे या समाजातून मुख्यमंत्री झालेले एकमेव नेते आहेत.