मडगाव: लॉकडाऊच्या काळात शाळा आणि महाविद्यालये बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण हा परवलीचा शब्द बनला असला तरी नेत्रावळी अभयारण्य परिसरातील विद्यार्थ्यांना नेटवर्क मिळत नसल्याने ती मोठी अडचण बनली आहे. नेटवर्क मिळविण्यासाठी त्यांना रोज दोन किलोमीटरची पायपीट करत डोंगरमाथा गाठण्याची पाळी आली आहे.
नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील कुमारी, पोत्रे , भाटी या गावातील विद्यार्थ्यांची ही व्यथा आहे. त्यांच्या भागात मोबाईल टॉवर नसल्याने हे शिक्षण कसे घ्यावे हा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा राहिला आहे. या गावातील सुमारे 20 ते 30 विद्यार्थी त्यासाठी रोज सकाळी आठ वाजता डोंगरमाथा चढू लागतात. डोंगर माथ्यावर आल्यानंतरच आम्हाला रेंज मिळते अशी माहिती वेर्णा येथे अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या नीलिमा येडको ह्या विद्यार्थिनीने सांगितले. दुपारी एक वाजता ही मुले खाली उतरून येतात पण दुपारी 2 वाजता त्यांना परत डोंगर चढावा लागतो. ज्यांची घरे दूर आहेत ती मुले जेवणाचा डबा घेऊनच येतात असे तिने सांगितले.
नेत्रावळी गावात बीएसएनएलचा मोबाईल टॉवर आहे पण तो व्यवस्थित चालत नाही त्यामुळे गावात कुणालाही रेंज असत नाही. जर काही उंचावर गेल्यास ही रेंज मिळू शकते त्यामुळेच ही मुले मुली एकत्र येऊन जंगल भागात रोज शिकायला जात असतात. 'आम्हाला माळरानात उघड्यावर बसून शिकावे लागते. जर पाऊस आला तर छत्रीच्या आडोशाला राहावे लागते. कित्येकवेळा पावसामुळे नेटवर्कची रेंज जाते, त्यामुळे पाऊस थांबण्याची आम्हाला वाट पाहावी लागते,' अशी माहिती केपे महाविद्यालयात शिकणाऱ्या पवित्रा गावकर हिने दिली.
हा जंगली भाग असल्याने साप आणि अन्य प्राणी या भागात फिरत असतात पण नाईलाजाने आम्हाला जीव धोक्यात घालून तिथे जावे लागते असे ती म्हणाली. याच भागात राहणाऱ्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्या राखी नाईक यांनी विद्यार्थ्यांच्या या समस्येवर सरकारचे लक्ष वेधले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून आपण हा विषय केंद्रीय दूरसंचार मंत्र्यापर्यंत पोहचविणार असल्याचे त्यांनी सांगितले.खरे तर या समस्येवर राज्य सरकार आणि स्थानिक खासदारांनी लक्ष घालून तोडगा काढण्याची गरज होती पण सगळे सुस्त बसले आहेत असे त्यांनी खेदाने म्हटले.