फोंडा : शहराच्या मध्यभागी असलेल्या कुडतरकर कमर्शियल आर्किड या इमारतीतील सुमारे 12 कार्यालये चोरट्यानी फोडली असून, गजबजलेल्या वस्तीत हा चोरीचा प्रकार घडल्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे.
सविस्तर वृत्तानुसार कुडतरकर कमर्शियल आर्केड ही फोंड्यातील मध्यभागी असलेली एक महत्त्वाची इमारत आहे. व्यावसायिक व रहिवासी अशी पाच मजली ही इमारत. बुधवारी रात्री सदर इमारतीत चोरट्यानी प्रवेश केला. दाराचे कुलूप व कडी मोडून त्यांनी कार्यालयांमध्ये प्रवेश केला. सदर चोरटे फक्त रोख किंवा किमती ऐवज चोरण्याच्या उद्देशानेच आले होते. कार्यालयात असलेले संगणक प्रिंटर्स व इतर वस्तूंना त्यानी हात नाही लावला.
प्रत्येक कार्यालयामधील ड्रॉवर फोडून आत काय मिळते का याचा त्यांनी सुगावा घेतला. काही कार्यालयामध्ये त्यांना जुजबी रोख हाती लागली. एका कार्यालयातील मोबाईल व लॅपटॉप मात्र त्यानी पळवला.
साधारणता नऊच्या नंतर व्यवसायिक आस्थापने बंद होतात. चोरट्याने पहिल्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयांना आपले लक्ष केले. तिसऱ्या मजल्यावरील एकच कार्यालय त्यांनी फोडले. चौथ्या व पाचव्या मजल्यावर रहिवाशी सदनिका आहेत. तिथे त्यांनी चोरीचा प्रयत्न केला नाही. काही दिवस रेकी केल्यानंतरच हा चोरीचा प्रयत्न त्यानी केला असावा. कारण इमारतीत सुरक्षा रक्षक नसल्याचे त्यांच्या लक्षात आले असावे. त्याचबरोबर महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसविण्यात आलेले नाहीत. जी काही किरकोळ सीसीटीव्ही यंत्रणा आहेत त्याचा वापर करून चोरट्यांचा मागोवा काढण्याचे आव्हान पोलिसां समोर आहे.
सकाळी कार्यालयीन कर्मचारी ऑफिसमध्ये आल्यानंतर चोरीचा हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी लगेचच आपल्या वरिष्ठांना सांगितल्यानंतर पोलिसांना आचारण करण्यात आले. पोलिसांनी चोरानी लक्ष केलेल्या इमारतीत पोहोचून पंचनामा केला आहे. आपल्या परीने तपास सुरू केला आहे.