पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अंत्यदर्शनासाठी जसे गोव्यातील कानाकोपऱ्यातून लोक पणजीत धावून आले तसेच आणखी एक जमातही धावून आली, आणि ही जमात होती खिसेकापुंची. ३२ लोकांचे खिसे साफ केल्याचा गुन्हा पणजी पोलिसांत नोंद झाला आहे. त्यातील १३ जणांना पोलिसांनी पकडलेही आहे.
बहुतेक सर्वच खिसेकापू हे गोव्याबाहेरील होते. अंत्ययात्रेला पांढऱ्या वेशात जाण्याची पद्धत आहे. सर्व खिसेकापू पांढरा शर्ट घालूनच आले होते. भाई भाई करीत गर्दीत मिसळले आणि त्याच गर्दीत लोकांच्या खिशातील पाकिटे चोरली. १३ जणांना पाकीटे मारतानाच लोकांनी पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. भाजपा मुख्यालयाकडे, कला अकादमीच्या प्रवेशद्वाराजवळ आणि मिरामार या तिन्ही ठिकाणी या खिसेकापूनी आपल्या हरकती केल्या. एक खिसेकापूने तर दोन जणांची पाकीटे चोरली होती व तिसरे चोरताना तो पकडला गेला. १३ पकडले गेले असले तरी असे कितीतरी निसटलेही आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे जाहीर करतानाच अंत्यसंस्काराच्या विधीचे वेळापत्रकच दिले होते. सकाळी भाजप मुख्यालयाजवळ दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर ११.३० ते ४.३० पर्यंत कांपाल येथे कला अकादमीत तर नंतर तेथून मिरामार येथे नेऊन अंतीम संस्कार करण्यात आले. या वेळापत्रकाची आगाऊ माहिती मिळाल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळणार याचा अंदाज असल्यामुळे या खिसेकापूंनी संधी साधली.