वास्को: दक्षिण गोव्यातील वेर्णा पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या नागोवा आणि वेर्णा औद्योगिक वसाहत अशा जवळ जवळच्याच परिसरात असलेल्या चारचाकी विकणाऱ्या दोन शोरुममध्ये अज्ञात चोरट्यांनी घुसून ३ लाख ३३ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम लंपास केली. नागोवा येथील ‘गोवा मोटर्स प्रा लि’ ह्या शोरुममधून चोरट्यांनी २ लाख ७३ हजार ८०० रुपयांची तर वेर्णा येथील ‘काकुलो कार्स प्रा लि’ या शोरुममधून ६० हराजांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार ‘गोवा मोटर्स’मध्ये अज्ञात चोरट्यांनी बुधवारी (दि.२६) रात्री ७.३० ते मध्यरात्रीनंतर १२.१० च्या सुमारास चोरी केली. अज्ञात चोरट्यांनी त्या शोरुमच्या ‘शटर’ चे नुकसान करून आत प्रवेश केल्यानंतर आत असलेली तिजोरी (केश सेफ बोक्स) फोडून त्यातील २ लाख ७३ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम घेऊन तेथून पोबारा काढला. चोरी झाल्याचे उघड होताच शोरुमचे सरव्यवस्थापक विजय कामत यांनी पोलीस स्थानकात त्याबाबत तक्रार नोंदवली. वेर्णा पोलीसांनी त्या चोरी प्रकरणात गुरूवारी (दि.२७) दुपारी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादस ४५४, ४५७, ४२७ आणि ३८० कलमाखाली गुन्हा नोंद करून त्या चोरट्यांना गजाआड करण्यासाठी त्यांचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान ‘गोवा मोटर्स’ पासून थोड्याच अंतरावर असलेल्या ‘काकुलो कार्स’ शोरुममध्ये अज्ञात चोरट्यांनी गुरूवारी (दि.२७) पहाटे २.०५ च्या सुमारास चोरी केल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली. त्या शोरुममध्ये असलेल्या एका ‘कॅबीन’ च्या खिडकीचा दरवाजा उघडून दोन अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर तेथील एका ठीकाणी ठेवलेली ६० हजाराची रोख रक्कम चोरट्यांनी घेऊन घटनास्थळावरून पोबारा काढला.
चोरी झाल्याचे समजताच शोरुमचे उपाध्यक्ष ओस्कर फर्नांडीस यांनी वेर्णा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. वेर्णा पोलीसांनी गुरूवारी संध्याकाळी त्या प्रकरणात अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादस ३८० आरडब्ल्यु ३४ कलमाखाली गुन्हा नोंद केला असून चोरट्यांना गजाआड करण्यासाठी सर्व मार्गांने त्यांचा शोध घेण्याचे काम चालू आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार जेव्हा दोन्ही शोरुमात चोरीची घटना घडली त्यावेळी तेथे त्यांचे नियुक्त केलेले सुरक्षा रक्षक (सेक्युरीटी) होते. त्या परिसरातील ‘सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज’ च्या मदतीने चोरट्यांपर्यंत पोचण्याचा पोलीस प्रयत्न करत असून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस अन्य विविध पावले उचलत आहेत.