पणजी: व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देश सोडण्याचा आदेश दिलेल्या सहा इंडोनेशियन महिलांना मुंबई उच्च न्यायायाच्या पणजी खंडपीठाने दिलासा देताना या प्रकरणाचा फेरविचार करण्याचा आदेश गोवा पोलिसांच्या विदेशी नागरीक नोंदणी विभागाला दिला आहे. गोव्यात वैद्यकीय कंपनीत प्रशिक्षक म्हणून नोकरीसाठी व्हिसा घेवून आलेल्या ६ इंडोनेशियाच्या महिलांना गोवा पोलिसांच्या विदेश विभागाने देश सोडण्यासाठी नोटीस बजावली होती. व्हिसाचे नियम या महिलांकडून उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या महिलांकडून त्यांच्या गोव़्यातील वास्तव्याची माहिती कायद्यानुसार १४ दिवसांत विदेश विभागाला देणे आवश्यक होती. परंतु त्यांनी तसे केले नाही. या शिवाय या महिला वैद्यकीय कंपनीत काम करण्याच्या कंत्राटावर आल्या होत्या, परंतु त्या स्पामध्ये मसाज करण्याचे काम करीत होत्या, असे आढळून आले आहे. हेही व्हिसा नियमांचे उल्लंघन ठरते. त्यामुळे त्यांना विदेश विभागाने देश सोडण्यास सांगितले होते. विदेश विभागाच्या आदेशानंतर या सहा महिलांनी खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठात सादर केलेल्या याचिकेत त्या महिलांनी आपली चूकही मान्य केली आहे, परंतु विदेश विभागासमोर स्पष्टीकरण देण्याची संधी देण्याची आणि या विभागाला आपल्या निर्णयाच्या बाबत फेर विचार करण्याची मागणी याचिकेत केली होती. न्यायमूर्ती एन एम जामदार व पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने त्यांना दिलासा देताना विदेश विभागाला या प्रकरणात पुन्हा एकदा सुनावणी घेऊन काय तो निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे.
'त्या' सहा इंडोनेशियन महिलांविषयी फेरविचार करा - पणजी खंडपीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:44 PM