लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गोव्याच्या मंत्रिमंडळात लोकसभा निवडणुकीपूर्वी फेररचना करण्याचा विचार दिल्लीतील भाजप नेत्यांच्या वर्तुळात जोर धरू लागला आहे. राज्यातील काही मंत्र्यांना याची कुणकुण लागली आहे. चौघा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देऊन त्याजागी नव्या चार आमदारांना स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.
एका मंत्र्याला दिल्लीत बोलावून घेतले गेले आहे. तो राज्यात परतल्यानंतर दुसऱ्या एका मंत्र्याला दिल्लीत बोलावून घेतले जाईल. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांना गोव्यात निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी बनविले गेले आहे. चंद्रशेखर यांनी अलिकडेच पणजीत सर्व मंत्री आमदारांची बैठक घेतली होती. त्यावेळी दक्षिणेची जागा जिंकणे सहज सोपे नाही, खूप कष्ट करावे लागतील, असे विधान मंत्री नीलेश काब्राल यांनी केले होते. त्यामुळे काब्राल यांना दिल्लीत बोलावून घेतले गेले. काब्राल यांनी काल दिल्ली गाठली.
आमदार दिगंबर कामत, आलेक्स सिक्वेरा यांच्यासह अन्य दोघांना मंत्रीपद दिले जाईल व विद्यमान चौघा मंत्र्यांना डच्चू दिला जाईल, अशी चर्चा आमदारांत रंगली आहे. अर्थात यात किती तथ्य आहे ते दिल्लीतील भाजप नेतेच सांगू शकतील. संकल्प आमोणकर यांनादेखील मंत्रीपद दिले जाऊ शकते.
ज्यांना आपण भाजपमध्ये घेताना मंत्रीपद देण्याची ग्वाही दिली होती, त्या सर्वांना मंत्रीपद देऊया असे दिल्लीत भाजप नेत्यांच्या स्तरावर ठरू लागले आहे. मंत्रीपदे दिली नाही तर भाजपच्या ज्येष्ठांकडून दिल्या जाणाऱ्या शब्दावरील विश्वासच गळून पडेल असे नेत्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, रात्री मिळालेल्या माहितीनुसार गोव्याचे दोन मंत्री सध्या दिल्लीत आहेत. एका मंत्र्याने भाजपच्या मुख्यालयास रात्री भेट दिली. मंत्री विश्वजीत राणे हे देखील इंदोरमधील सगळे प्रचार काम संपवून दिल्लीत दाखल झाले आहेत. पाच राज्यातील निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेच गोव्यात मंत्रिमंडळाची फेररचना होईल, अशी माहिती मिळाली.