मडगाव - गोव्यात गाजलेल्या 2014 सालच्या कथित खाण घोटाळा प्रकरणाची सुनावणी तिसऱ्यांदा तहकूब झाली. सुनावणी प्रकरणात या खटल्याने आता आपली हॅटट्रिक केली आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे मडगाव मतदारसंघाचे आमदार दिगंबर कामत हे या खटल्यातील एक संशयित आहेत. त्याशिवाय खाण मालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पुढारी प्रफुल्ल हेदे व अँथनी डिसोझा हे या प्रकरणातील अन्य संशयित आहेत. दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीक्ष सायनोरा लाड यांच्या न्यायालयात हा खटला सुरू आहे.
शनिवारी (3 नोव्हेंबर) हा खटला सुनावणीस आला असता, या खटल्याची सुनावणी घेण्यासाठी वेगळया न्यायालयाची व न्यायाधीशांची नियुक्ती करावी म्हणून केलेला अर्ज उच्च न्यायालयात पडून असल्याने सरकारी अभियोक्ताने वेळ मागवून घेतला. मागाहून न्यायाधीक्ष सायनोरा लाड यांनी सुनावणी तहकूब केली. आता या खटल्याची पुढील सुनावणी 1 डिसेंबर रोजी होणार आहे.
यापुर्वी 18 ऑगस्ट व नंतर 29 सप्टेंबरला हा खटला सुनावणीस आला असता, न्यायाधीक्ष सुटटीवर असल्याने हा खटला तहकूब करण्यात आला होता. मागच्या सुनावणी वेळी हा खटला खास न्यायालयात घेणे आवश्यक असून, त्यासाठी प्रक्रिया सुरु आहे. उच्च न्यायालयाच्या मान्यतेसाठी ते प्रलंबित असून, सुनावणी तहकूब करावी अशी मागणी करण्यात आल्याने, दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली होती. या खटल्यात आता युक्तीवाद केला व नंतर खास न्यायालयात हा खटला सुरु झाला तर पुन्हा युक्तीवाद करावा लागेल असा युक्तीवादही त्यावेळी खास सरकारी वकिलांनी केला होता. खाण व खनिज कायदयांतर्गत गुन्हा खास न्यायालयात चालणे आवश्यक असल्याचे खास सरकारी वकिलाने अर्जात नमूद केले होते.
डॉ. हेदे यांच्या कुळे येथील खाण सुरू करण्यासाठी बेकायदेशीररित्या ‘कंडोनेशन ऑफ डिले’ची सवलत देऊन बेकायदेशीररित्या लीज परवान्याचे नुतनीकरण केल्याचा भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याच्या एसआयटीने कामत व डॉ. हेदे तसेच अँथनी डिसोझा यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे. कामत यांच्यासह हेदे व डिसोझा यांच्याविरुद्ध खाण कायदयाखाली कारस्थान रचणे, फसवणुक करणे व भ्रष्टाचाराच्या कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी)ने दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयात संशयितांविरुध्द आरोपपत्र दाखल केले आहे. 1572 पानाचे हे आरोपपत्र असून, त्यात 40 साक्षीदारांचे जबाब जोडलेले आहेत.