पणजी- गोव्याची राजधानी असलेल्या पणजी शहराच्या पायाभूत साधनसुविधांमध्ये मोठी भर टाकणारा तिसरा मांडवी पूल सध्या दिमाखात उभा राहत आहे. येत्या सहा महिन्यांत या पुलाचे काम पूर्ण होईल. सरकारने त्याचदृष्टीने कामाला वेग दिला आहे. काम हळूहळू अंतिम टप्प्यात येऊ लागले आहे.
मांडवी नदीवर सध्या दोन पूल आहेत. तथापि, म्हापसाहून पणजीत येणारी व म्हापसाहून पणजीमार्गे फोंडा, मडगाव आणि वास्कोत जाणारी वाहतूक वाढली आहे. या वाढत्या वाहतुकीमुळे पणजीत वाहनांची संख्या वाढते व पणजी बस स्थानकाकडे वाहतूक कोंडी होते. यावर उपाय म्हणून तिसऱ्या मांडवी पुलाची कल्पना 2012 साली पुढे आली. लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीला सुमारे साडेचारशे कोटी रुपयांना या कामाचे कंत्रट दिले गेले. काम सुरू झाल्यानंतर पहिली दोन वर्षे कामाचा वेग थोडा कमी होता. गेल्या मार्च 2017 मध्ये मनोहर पर्रीकर पुन्हा मुख्यमंत्री बनल्यानंतर कामाने वेग घेतला. आता पुलाचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ 30 टक्के काम बाकी असून ते काम येत्या पाच ते सहा महिन्यांत पूर्ण होईल असे गोवा साधनसुविधा विकास महामंडळाच्याही अधिकाऱ्यांना वाटते.
मांडवी नदीवर तिसरा पूल होणार असे दहा वर्षापूर्वी कुणाला सांगितले तर ते खरे मानले जात नव्हते. दोन पुल असताना तिसऱ्या पुलाची गरज नाही असा देखील दावा केला जात होता. मात्र अलिकडे वाहन संख्याच एवढी वाढली की, तिसऱ्या पुलाची गरज भासू लागली. तिसऱ्या पुलामुळे फोंडा किंवा मडगाव व वास्कोला जाणा:या वाहनांना पणजीत कदंब बसस्थानकाकडे उतरावेच लागणार नाही. या वाहनांना थेट मडगाव, वास्को किंवा फोंडय़ाच्या दिशेने तिसऱ्या पुलावरून जाता येईल. केवळ पणजी शहरात येणारी वाहनेच तेवढी खाली उतरतील. तिसऱ्या पुलामुळे पहिल्या व दुसऱ्या पुलावरील भार देखील कमी होणार आहे. मध्यंतरी राष्ट्रीय हरित लवादाकडे काही महिने या पुलाच्या कामाबाबतचा एक खटला चालला. त्यामुळेही कामाला पाच-सहा महिन्यांचा विलंब लागला, असे सांगण्यात येते.येत्या ऑगस्ट महिन्याच्या आसपास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करावे असा गोवा सरकारचा प्रयत्न आहे.