पणजी : गोव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेवळी जी धरपकड झाली त्याचा प्रदेश कॉंग्रेसने निषेध केला आहे. ही लोकशाहीची हत्त्या असल्याचे म्हटले आहे. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, भाजपने कर्नाटकात विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी म्हादईचा केलेल्या ‘कराराचा’ निषेध करण्यासाठी ते शाह यांना केवळ काळे झेंडे दाखवणार होते, मात्र त्यांच्यावर आधीच कारवाई करण्यात आली.
पाटकर म्हणाले कि, संपूर्ण सरकारी यंत्रणा आमच्या विरोधात वापरली गेली. आम्ही फोंड्यात पोहचण्या आदीच आम्हाला वाटेत अडवून ताब्यात घेण्यात आले. महिला नेत्यांनाही कुळे येथील पोलिस ठाण्यात नेण्यात आले.’ ते म्हणाले की, आम्हाला शाह यांच्याकडून केवळ म्हादईच्या मुद्द्यावरून स्पष्टीकरण जाणून घ्यायचे होते, ज्यांनी कर्नाटकातील बेळगावी येथील रॅलीत सांगितले होते की ‘ केंद्रातील भाजपने गोवा आणि कर्नाटक यांच्यातील म्हादईचा दीर्घकाळचा वाद सोडवला आहे आणि गोव्याच्या संमतीने म्हादईचे पाणी वळविण्याची परवानगी दिली आहे.’ "आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की त्यांनी आमची म्हादई कर्नाटकला विकली आहे का," असे पाटकर म्हणाले.अमरनाथ पणजीकर म्हणाले की, काँग्रेस नेते केवळ म्हादईच्या मुद्द्यावर भाजप नेत्यांकडून स्पष्टीकरण मागून निषेध करण्याचा प्रयत्न करत होते. शाह यांच्या सभेपूर्वी काँग्रेस नेत्यांना नजरकैदेत ठेवले. मी जुने गोवें येथे माझ्या बहिणीच्या घरी गेलो होते तेथे मला नजरकैदेत ठेवण्यात आले. मला बाहेर जाण्याची परवानगी दिली नाही. भाजपने लोकशाहीची हत्या केली आहे.’ दरम्यान, माजी प्रदेशाध्यप गिरीश चोडणकर म्हणाले की, ‘भाजपच्या या कृत्याचा मी निषेध करतो. अमित शहा यांनी कर्नाटक निवडणुकीसाठी डील केली आणि आमच्या म्हादईशी तडजोड केली. सर्व कॅबिनेट मंत्री त्यांचे स्वागत करत आहेत ही लाजिरवाणी गोष्ट आहे.’