गोवा म्हणजे भारतीय संस्कृतीपासून काही तरी वेगळे आहे, असे दाखविण्याचा प्रयत्न गेली ६० वर्षे ठरावीक मानसिकतेच्या एका गटाकडून सातत्याने सुरू असतो. पूर्वी सोशल मीडिया नव्हता. आता सोशल मीडियाचा काळ आहे. त्यामुळे कोण कुठे बसून गोव्याच्या प्रतिमेविषयी काय भावना जपतोय किंवा लिहितोय, हे सहज कळते. फेसबुक व ट्रीटरवर काही गोंयकारांच्या गोव्याविषयीच्या भावना व मनातील प्रतिमा यांचे प्रकटीकरण पाहिले तर धक्का बसतो.
स्वातंत्र्य सैनिकांविषयीही आदर नसलेले महाभाग दक्षिण गोव्याच्या काही भागात आहेत, हे सोशल मीडियावरून कळून येते. परवा एकाने फेसबुकवरूनच संदर्भ दिला आहे. तो असा की गोवा मुक्ती चळवळीतील स्वातंत्र्य सैनिकांनी आयुष्यात प्रथमच १९६३ साली विधानसभा निवडणूक लढवली व सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे डिपॉझिट जप्त झाले. संदर्भ खरा असला तरी, तो नकारात्मक अर्थाने दूषित हेतूने दिला गेला आहे. खरा गोवा म्हणजे काय हे काल-परवा साजऱ्या झालेल्या शिवजयंतीमधून दिसून आले, असे नमूद करावेच लागेल. कधी तरी या विषयावर चर्चा, उहापोह होणे गरजेचे होते व आहे. रविवारी शिवजयंती साजरी झाली. एकाबाजूने कार्निव्हलची धूम आहे, पण कार्निव्हलची संस्कृती म्हणजे पूर्ण गोंयकारपण नव्हे किंवा कार्निव्हलद्वारे तयार केले जाणारे वातावरण हे प्रामुख्याने पर्यटकांसाठीच असते, असे एका मर्यादित अर्थाने म्हणता येते.
गोव्याशी शिवाजी महाराजांचा काहीच संबंध नाही किंवा गोव्यात शिवाजी महाराजांचे पुतळे कशाला वगैरे प्रश्न काही तथाकथित गोंयकारवादी अधूनमधून उपस्थित करतात. मात्र, असे प्रश्न विचारणारे काही राजकारणीदेखील आता शिवजयंतीत सहभागी होऊ लागले आहेत. कारण प्रवाहाची दिशा त्यांना कळू लागलीय. उत्तर व दक्षिण गोव्यात रविवारी साजरी झालेली शिवजयंती पाहा. तेथील उत्साह, तेथील शिवयुक्त दमदार वातावरण आणि मनाला भारून टाकणारी वेशभूषा व संगीत याचा आनंद ज्यांनी घेतला त्यांना खरा गोवा कळून येईल. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा गोव्याशी पूर्ण संबंध होता. तो इतिहास बदलता येणार नाही. पोर्तुगीज गोव्यात आलेच नसते तर गोवा पूर्णपणे एकसारखाच अनुभवास आला असता.
एकसारखाच म्हणजे पूर्णपणे भारतीय संस्कृतीच पावलोपावली अनुभवास आली असती. आता ती येतेच, पण त्याला छेद देण्याचा प्रयत्न काही घटक करत असतात. गोव्यात धार्मिक सलोखा कायम आहे आणि तो जपायलाच हवा. त्यामुळेच तर शिवजयंतीमध्ये काही मुस्लिम बांधव व काही ख्रिस्ती बांधवही सहभागी होत असतात. वाळपईपासून बेतुलपर्यंत अनेक ठिकाणी हे चित्र दिसून येते. काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी तर बेतुल किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभा करायला हवा, असे सुचविले.
शिवाजी महाराजांचा गोव्याशी संबंध किती होता, या विषयावर कदाचित यापुढील काळात विजय सरदेसाई वगैरे एखादे व्याख्यानदेखील देऊ शकतील. आलेक्स रेजिनाल्डदेखील दरवर्षी शिवजयंती उत्साहात साजरी करतात. मंत्री माविन गुदिन्हो हेदेखील मुरगाव तालुक्यात शिवजयंतीचा मनसोक्त आनंद घेतात. डोक्याला फेटा बांधून शिवजयंती साजरी करणारे मावळे हे गोव्याच्या खऱ्याखुऱ्या संस्कृतीचे प्रतीक आहेत, असे म्हणता येते. वीस वर्षापूर्वी गोव्यात अगदी कमी संख्येने शिवरायांचे पुतळे होते. सार्वजनिक ठिकाणी खूप कमी संख्येने प्रतिमा होत्या. मात्र, शिवरायांच्या प्रती लोकांच्या मनात त्यावेळीही मोठी भक्ती होती व आताही आहे. गोव्यात आता अधिकाधिक भागांमध्ये शिवजयंती अपूर्व उत्साहात साजरी होते. बहुतेक ठिकाणी शिवरायांच्या प्रतिमा साकारत आहेत. शिवरायांप्रती भक्ती वाढतेय, कारण छत्रपतींचे योगदान गोमंतकीयांना ठाऊक झाले आहे.
शिवरायांनी धर्मभेद केला नाही, सर्वांना समान वागविले हेही गोमंतकीयांना मान्य आहे. मात्र, गोवा म्हणजे केवळ खाओ, पिओ, मजा करो एवढेच नव्हे, हा चुकीचा समज पसरविणाऱ्यांना पटवून द्यावे लागेल. गोव्यात शिवरायांचे स्तोम माजवायला नको असा विचार काहीजण मांडतात, हे वाचून व ऐकून वेदना होते. फर्मागुढीच्या किल्ल्याचे नूतनीकरण करू, फेरबांधणी करू, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी केली. ती स्वागतार्ह आहे; पण आग्वाद किल्ल्यावरील दारूविक्री मुख्यमंत्र्यांनी त्वरित बंद करावी, असे येथे सुचवावेसे वाटते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"