किशोर कुबल/पणजी
पणजी : मुसळधार पाऊस कोसळत असल्याने स्मार्ट सिटीच्या कामांबाबत हा कसोटीचा क्षण आहे. या कामांमध्ये कुठे काय चुकले हे आता कळेल व त्याप्रमाणे सुधारणा करु. व्यवस्यापकीय संचालकांकडून कामांचे मुल्यांकन चालू आहे, असे स्थानिक आमदार तथा महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी सांगितले.
बाबुश म्हणाले की, बाहेर मुसळधार पाऊस आहे. आम्ही केवळ पावसाला दोष देऊ शकतो. खरे तर स्मार्ट सिटीच्या कामांबाबत कुठे काय चुकले हे आता स्पष्ट होईल.
कंत्राटदाराने कसेही काम केले तरी जबाबदारी कन्सल्टंटची आहे. कारण तोच प्रकल्प डिझाइन करत असतो व काम समाधानकाररित्या पूर्ण झाल्याचे प्रमाणीकरण करुन अंतिम बिल मंजूर करत असतो. राजधानी शहरात पावसामुळे खड्डे पडल्याने त्याबद्दल विचारले असता बाबुश म्हणाले की, आता केवळ हंगामी डागडुजीच करता येईल. पावसाळा संपल्यानंतरच कायमस्वरुपी हॉटमिक्सिंग वगैरे केले जाईल.दरम्यान, सांतइनेज येथे सर्कल येणार आहे त्यासाठी जी बेकायदा बांधकामे परिसरात आलेली आहेत ती पाडली जातील, असे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले.