'ते' काँग्रेससाठी खरेच अनुकूल? सासष्टीतील वेळ्ळी, कुडतरी, फातोर्डा मतदारसंघाबाबत तर्काना उधाण
By सूरज.नाईकपवार | Published: April 10, 2024 08:44 AM2024-04-10T08:44:22+5:302024-04-10T08:45:46+5:30
तूर्त या टप्प्यावर निश्चित असा निष्कर्ष काढता येत नाही.
सूरज पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : सासष्टी तालुक्यातील काही विधानसभा मतदारसंघ हे काँग्रेसचे अभेद्द गड मानले जातात. त्यात आता काँग्रेस व आपची युती झाली असून, गोवा फॉरवर्ड पक्षाचाही पाठिंबा इंडिया आघाडीला असल्याने या तालुक्यातील काँग्रेसची स्थिती बळकट झाली आहे, असे काँग्रेसजनांना वाटते. नेत्यांच्या दाव्यानुसार या मतदारसंघांतील स्थिती काँग्रेसला खरेच अनुकूल आहे की नाही, हे पुढील काही दिवसांत कळून येईल. तूर्त या टप्प्यावर निश्चित असा निष्कर्ष काढता येत नाही.
फातोर्डा मतदारसंघात गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई हे आमदार आहेत. याही मतदारसंघात काँग्रेसची मते आहेत, तसेच भाजपाचीही या मतदारसंघात एकगठ्ठा मते आहेत. त्यामुळे येथील स्थिती सध्या तरी फिफ्टी-फिफ्टी अशी आहे.
मडगाव हा आमदार दिगंबर कामत यांचा बालेकिल्ला आहे. ते सांगेल ती पूर्वदिशा अशी येथील मतदारांची स्थिती आहे. सध्या ते भाजपात आहेत. त्यांची स्वतःची व भाजपाची एकगठ्ठा मते ही भाजपसाठी एकदम जमेची बाजू आहे. या मतदार- संघात आरजी तसेच काँग्रेसचेही स्थान डळमळीत आहे. दक्षिण गोव्यातील विधानसभेच्या या तिन्ही मतदारसंघाकडे राज्यभरातील जनतेचे लक्ष असते. येथ अल्पसंख्यांक मतदाराही संख्येने अधिक आहेत.
कॅथॉलिक समाजाचे सासष्टी तालुक्यात वर्चस्व आहे. काँग्रेसने कॅप्टन विरियातो फर्नाडिस हा चेहरा लोकसभेसाठी दिल्याने तीही एक इंडिया आघाडीसाठी जमेची बाजू ठरली आहे, असे काँग्रेसच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे. वेळळीचे सध्या आपचे कूझ सिल्वा हे आमदार आहे, हा मतदारसंघ तसा पूर्वीपासून अपवाद वगळा काँग्रेस धर्जिणाच राहिलेला आहे. येथे आरजीचेही अस्तितव आहे. मागच्या खेपेला आरजीचे उमेदवार डेजिल पेरेरा यांनी • तिसऱ्या क्रमाकांची मते मिळविली होती, तर काँग्रेसचे सावियो डिसिल्वा हे दुसऱ्या क्रमाकांवर होते. भाजपला तसे या मतदारसंघात स्थान नाही.
कुडतरी हा ही मतदारसंघ तसा काँग्रेसचाच आहे. सध्या या मतदारसंघात आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे अपक्ष आमदार आहेत. त्यांनी भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांच्या प्रचाराला प्रारभंही केला आहे. मात्र, ख्रिस्ती लोकांची किती मते ते कमळाच्या पारड्यात टाकण्यास यशस्वी हे बघावे लागेल. मागच्या खेपेला या मतदारसंघात आपच्या उमेदवारालाही चांगली मते मिळाली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत किती फरक पडतो हेही दिसून येईल.