पणजी - अतिरिक्त वीज वापरणा-या लोकांनी अतिरिक्त वीजेसाठी ३० दिवसांच्या आत अर्ज करण्याची सूचना वीज खात्याकडून ग्राहकांना करण्यात आली आहे. अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. वीज ग्राहकांनी ज्या प्रमाणात वीजेची मागणी करण्यात आली आहे त्यानुसार त्यांना वीज जोडण्या देण्यात येतात. कमी क्षमतेची वीज जोडणी असलेले ग्राहकही अनेकवेळा अतिरिक्त वीज वापरत असल्याचे आढळून आले आहे.
राज्यात होत असलेल्या खंडित वीज पुरवठ्याचे हे एक काम असल्याचे वीज खात्याचे मुख्य अभियंते एन एन रेड्डी यांनी म्हटले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वीज खात्याने आवश्यकतेनुसार वीजपूरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या लोकांना अतिरिक्त वीजेची गरज लागते त्यांनी अजपासून ३० दिवसांच्या आत अतिरिक्त वीजेची मागणी करणारे अर्ज वीज खात्यात सादर करावेत अशी सूचना करण्यात आली आहे.
एखाद्या भागात किती वीजेची नेमकी आवश्यकता आहे याचा अंदाज खात्याला यामुळे मिळणार आहे. त्यामुळे तितक्या क्षमतेचे ट्रान्स्फॉर्मर त्या भागात बसवून वीज पूरवठा करणे खात्याला शक्य होणार आहे. ३० दिवसांच्या आत ज्या ग्राहकांनी अतिरिक्त वीज जोडणीसाठी अर्ज केला नसेल आणि त्यांच्या वीज बिलात अतिरिक्त वीज खर्च केलेली आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. तशी जाहिरातही खात्याकडून जारी करण्यात आली आहे.
अतिरिक्त वीज वापरण्याचे प्रकार सर्रास घडत नसले तरी किनारी भागात मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचे खात्याला आढळून आले आहे. देण्यात आलेले वीजेचे प्रमाण व प्रत्यक्ष खर्च करण्यात आलेली वीज यात फार मोठा तफावत आढळून आली आहे. त्यामुळे वीज खात्याने हे पाऊल उचलले आहे.