किशोर कुबल/पणजी
पणजी : दहशतवादाचा धोका कायम आहे, असे म्हणत केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी गोव्यात चालू असलेल्या शांघाय को ॲापरेशन ॲार्गनायझेशन सदस्य राष्ट्रांच्या बैठकीत पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहारमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांचे कान टोचले.बैठकीत दहशतवादाबद्दल बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की,‘भारताला सीमापार दहशतवादाचा धोका अजूनही कायम आहे. दहशतवद्यांना फंडिंग करणे बंद झाले पाहिजे. दहशतवादाचा मुकाबला करणे हे या संघटनेच्या मूळ उद्देशांपैकी एक आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की, ‘दहशतवादाकडे डोळेझाक करणे आमच्या सुरक्षेसाठी हानिकारक ठरेल. आम्हाला ठाम विश्वास आहे की दहशतवादाचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही. सीमेपलीकडील दहशतवादाला खतपाणी घालण्याचे प्रकार बंद करावेत.’
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान २०१७ साली या संघटनेचे स्थायी सदस्य झाले. जयशंकर यांनी चीन, रशिया आणि उझबेकिस्तानच्या विदेशमंत्र्यांशी द्विपक्षीय बैठक घेऊन चर्चा केली. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्याशी चर्चेत दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमधील द्विपक्षीय जागतिक आणि बहुपक्षीय सहकार्याचा आढावा घेतला. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, दोन्ही नेत्यांनी उभय राष्ट्रांमधील विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारीच्या महत्त्वाच्या क्षेत्रात सहकार्याच्या गतीशीलतेचे कौतुक केले. जयशंकर यांनी चीनच परराष्ट्र व्यवहारमंत्री किन गँग यांच्याशीही बैठक घेतली. या चर्चेत प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्यावर आणि सीमावर्ती भागात शांतता आणि शांतता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला. उझबेकिस्तानचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सैदोव यांचीही भेट घेतली आणि द्विपक्षीय भागीदारी वेगवेगळ्या क्षेत्रात वृध्दिंगत होईल, असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला. पाकिस्तान, चीन, रशिया, भारत तसेच मध्य आशियाई राष्ट्रें कझाकस्तान, किर्गिस्तान, ताझिकिस्तान व उझ्बेकीस्तान ही आठ राष्ट्रे शांघाय को-ॲापरेशन ऑर्गनायझेशनची सदस्य आहेत. या राष्ट्रांचे विदेशमंत्री दोन दिवसीय बैठकीत भाग घेत आहेत.