ऑनलाइन लोकमत
पणजी, दि.04 - देशाच्या सीमेवरील तणावाच्या पार्श्वभुमीवर दक्षिण गोव्यात होणार असलेल्या ब्रीक्स परिषद उधळून लावण्याच्या धमक्या आल्याची माहिती गोवा पोलीस खात्याचे उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांनी दिली.
१४ आॅक्टोबर ब्रीक्स परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्र आणि राज्य सरकार युद्धपातळीवर तयारीला लागले असले तरी ही परिषद उधळून लावण्याच्या धमक्या आयोजक आणि सुरक्षा यंत्रणांना मिळत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत अतिदक्षता घेतली जात आहे. कोणत्याही प्रकारची कसर राहणार नाही याविषयी सुरक्षा यंत्रणा तत्पर आहेत. केंद्रीय सुरक्षा यंत्रणे आहेतच, परंतु गोवा पोलिसांकडूनही सर्व प्रकारच्या खबरदा-या घेतल्या जातील अशी माहिती पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांनी दिली. या परिषदेला जागतिक नेते येणार असल्यामुळे सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा भाग तर आहेच, शिवाय सीमेवरील तणावाच्या वातावरणामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान ब्रीक्स परिषदेच्या तयारीची मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडून मंगळवारी आढावा घेण्यात आला. या संबंधीच्या सर्व अधिका-यांची मुख्यमंत्र्यांनी सचिवालयात बैठक घेतली आणि ताज्या परिस्थितीची माहिती घेतली. तयारीची कामे अपेक्षित गतीने होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.