पणजी : आयपीएल बेटिंग प्रकरणी पोलिसांची मोहीम चालूच असून काल रविवारी रात्री क्राईम ब्रँच पोलिसांनी हडफडें येथे तीन गुजरातींना बेटिंग घेताना रंगेहाथ पकडून अटक केली. मोबाईल फोन तसेच अन्य साहित्य त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या आयपीएल मोसमात त्यांनी आतापर्यंत १ कोटी १७ लाख रुपयांहून अधिक रकमेचे बेटिंग घेतले. यात गुजरातच्या ग्राहकांचा अधिकाधिक समावेश आहे. गेले काही दिवस गोव्यातून हे रॅकेट चालविण्यात येत आहे,
याचा सुगावा लागताच रविवारी मध्यरात्री क्राईम ब्रँच पोलिसांनी हडफडे येथे ग्रीन व्हिजन व्हिल्लावर धाड घातली. अटकेतील तिघांची नावे हितेश केशवानी, शक्ती पंजाबी आणि विशाल आहुजा अशी असून तिघेही गांधीधाम, गुजरात येथे राहणारे आहेत. मोबाईल फोनवर बेटिंग घेतले जात होते. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.
याआधी कळंगुट पोलिसांनी तसेच क्राइम ब्रँचच्या अधिकार्यांनी गोव्यात वेगवेगळ्या धाडींमध्ये हैदराबाद तसेच अन्य ठिकाणच्या आयपीएल बेटिंग घेणाऱ्या सट्टेबाजांना गजांआड केले आहे. किनारपट्टी भागात एखादे घर भाड्याने घेऊन किंवा हॉटेलमध्ये वास्तव्य करून आयपीएल बेटिंग घेतली जाते. सट्टेबाजीचा हा प्रकार गोव्यात फोफावल्याने स्थानिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत या व्यवसायात पकडलेले सर्वजण परप्रांतीय आहेत.