पणजी : भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. लतादीदी मूळ गोव्याच्या होत. मुंबईत त्यांनी आपली कारकिर्द घडविली.
आज रविवार ६ ते ९ या हे तीन दिवस गोव्यात दुखवटा पाळला जाणार असून सरकारी कार्यक्रम होणार नाहीत. राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या व्हर्च्युअल सभा तसेच जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम भाजपने लतादीदींच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित केले.
मोदीजींच्या व्हर्च्युअल सभा स्थगित-
मोदीजी उत्तर गोव्यातील २0 ठिकाणी आज दुपारी ४.३0 ते ५.५0 या वेळेत व्हर्च्युअल सभांमधून संबोधणार होते. मुख्य कार्यक्रम रवींद्र भवन, साखळी येथे होणार होता. तसेच दुपारी १ वाजता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नीतीन गडकरी यांच्या हस्ते भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन होणार होते. हे कार्यक्रम तसेच पक्षाचे राज्यस्तरीय कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची व नवीन तारखा नंतर जाहीर केल्या जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.
मी व्यथित झालो- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भारतरत्न गानकोकिळा लतादीदींच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करताना ‘हे वृत्त ऐकून मी व्यथित झालो.’, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. लतादीदींच्या आत्म्याला सद्गती लाभो, अशी प्रार्थना करताना त्यांनी मंगेशकर कुटुंबियांना सहवेदना कळविल्या आहेत.