पणजी : तब्बल तीन वर्षांच्या बंदीनंतर राज्यातील पहिली खाण आज सोमवारी सुरू होत आहे. सेसा वेदांताच्या कोडली येथील खाणीचा आरंभ मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते होईल. खाण कामगारांबरोबरच अवलंबित ट्रकवाले, बार्जमालक, मशिनमालक यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जातो. खाणमालक नथुरमल कंपनीचे सीईओ हरेश मेलवानी म्हणाले की, वेदांताने खाणी सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला, ही स्वागतार्ह बाब आहे. तीन वर्षे व्यवसाय बंद आहे. कामगारांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत खाणी लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक आहे. इतर खाणींच्या बाबतीतही झटपट परवाने देऊन मार्ग मोकळा करावा. प्रदूषण नियंत्रण मंडळाने बैठकीचे इतिवृत्त झटपट करून परवाने द्यायला हवेत. देशातील पोलाद उद्योगांना खनिज हवे आहे, त्यासाठीही खाणी लवकर सुरू व्हायला हव्यात. गोवा फाउंडेशनचे संस्थापक ज्येष्ठ पर्यावरणप्रेमी क्लॉड अल्वारिस म्हणाले की, आपल्याला आरटीआयअंतर्गत मिळालेल्या माहितीत असे स्पष्ट झाले आहे की, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या बैठकीचे इतिवृत्त अजून तयार व्हायचे आहे. हवा, पाणी कायद्याखाली परवान्यांसंबंधीच्या निर्णयाला अंतिम स्वरूप मिळालेले नाही. अशा स्थितीत थेट खाण सुरू करता येणार नाही. आधी केलेला गैरव्यवहार माफ करून सरकारकडून त्यावर पांघरुण घालण्याचाच हा प्रकार आहे. खाणविरोधी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश गावस म्हणाले की, २0१३ च्या खाण धोरणात सरकारने जीपीएस सिस्टम, व्यवसायावर लक्ष ठेवण्यासाठी मॉनिटरिंग पॉइंट्स सुरू करण्याची ग्वाही दिलेली आहे. हे धोरण सर्वोच्च न्यायालयालाही सादर केलेले आहे. या गोष्टींची पूर्तता सरकारला करावी लागणार आहे. अन्यथा, तो कोर्टाचा अवमान ठरेल. या हालचालींमागे राजकीय दृष्टिकोनही आहे. पालिका निवडणुका जवळ येत आहेत. त्याआधी खाणी सुरू झालेल्या भाजप सरकारला हव्या आहेत. कुड्डेगाळ खाणबंदीचा आदेश मागे घ्यावा तसेच खनिज विकास महामंडळ स्थापन करून सर्व खाणी महामंडळाने ताब्यात घ्याव्यात, या मागणीसाठी ‘सिटू’च्या कुड्डेगाळ खाणीवरील कामगार कुटुंबीयांसह सोमवारी, १0 रोजी सकाळी विधानसभेवर मोर्चा काढतील, असे संघटनेचे पदाधिकारी जतिन नाईक यांनी स्पष्ट केले आहे. सकाळी १0 वाजता कामगार येथील कदंब स्थानकाजवळ जमतील आणि मोर्चा काढतील. (प्रतिनिधी)
तीन वर्षांच्या बंदीनंतर पहिली खाण आज सुरू
By admin | Published: August 10, 2015 1:27 AM