- पंकज शेट्येवास्को: दक्षिण गोव्यातील वास्को शहराच्या पोलीस स्थानक हद्दीत २०१९ मध्ये तीन खून प्रकरणे घडलेली असून या तीनही खून प्रकरणामागे दारूच्या नशेचा संबंध असल्याचे साफ दिसून आले. तसेच या तीनही खून प्रकरणांत खून करणारा संशयित आरोपी व मृत्यू झालेल्या व्यक्ती एकमेकांच्या जवळच्याच असल्याचे दिसून आले होते. या तिन्ही खून प्रकरणातील संशयितांना त्वरित कारवाई करून गजाआड करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले होते. या खून प्रकरणांत पोलिसांनी चौकशी तसेच तपास करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक नीलेश राणे यांनी दिली.या तीनही खुनांमागे दारूची नशा एक प्रमुख कारण असल्याचे दिसून आले. १ मे २०१९च्या रात्री मंगोरहील भागात दीपक दळवी (वय ४७) व अजीम शेख (वय ४४) यांच्यात दारूचे सेवन केल्यानंतर ‘तू माझ्याबद्दल बाहेर काय सांगितले? अशा किरकोळ विषयावरून दोघांत वाद निर्माण झाल्याचे व त्याचे पर्यावसान भांडणात झाल्याचे पोलिसांना प्राथमिक तपासणीत समजले होते. मंगोरहील भागातच राहणारा दीपक व आजीम या दोघांचा टॅक्सीचा व्यवसाय असून दोघेही जण मित्र होते. दारूच्या नशेत दोघांमध्ये किरकोळ विषयावरून वाद निर्माण झाल्यानंतर दीपकने अजीमवर सळीने तर अजीमने दीपकवर बाटलीने हल्ला केल्याने दोघेही जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले.या प्रकरणात पोलिसांनी प्रथम दोघांवर गुन्हा नोंद केला होता. अजीमवर उपचार केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली व दोन दिवसांनी सशर्त जामिनावर त्याची सुटका झाली. दरम्यान, मारहाण प्रकरणात गंभीररीत्या जखमी झालेल्या दीपकचा इस्पितळात उपचार चालू असताना ९ मे रोजी मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण खून म्हणून नोंद करून अजीम यास अटक केली होती.२ जून रोजी सकाळी वरुणापुरी - वास्को येथील नौदल वसाहतीत राहणाऱ्या संध्या चौहान या महिलेने तिचा पती कौशलेंद्र चौहान याचा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कौशलेंद्र हा दोन वर्षापासून गोवा नौदलाच्या विभागात काम करत होता.पोलिसांनी या खून प्रकरणाची चौकशी सुरू केली असता, कौशलेंद्र दारूच्या नशेत पत्नी संध्याची सतावणूक करत असल्याचे समजले. खून झालेल्या दिवशी दारूच्या नशेत कौशलेंद्र रात्री घरी परतल्यानंतर त्याने त्याच्या पत्नीस मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने घरात असलेल्या विविध सामग्रीची तोडफोड करण्यास सुरुवात करून नंतर दारूच्या नशेत त्याने त्याच्या सात वर्षीय मुलीला धक्का दिला. कौशलेंद्र याने मुलीला धक्का दिल्याचे पाहिल्यानंतर घरगुती हिंसेला कंटाळलेल्या संध्याने रागाच्या भरात कौशलेंद्रवर लाकडी काठीने (रिप) हल्ला केला असता तो खाली पडला. यानंतर संध्याने कैशलेंद्रच्या डोक्यावर त्या काठीने आणखीन वार केले. त्यामुळे तो नंतर मरण पावला, असे पोलीस चौकशीत समोर आले.११ सप्टेंबर रोजी चिखली येथे असलेल्या नौदलाच्या ‘नेवल आरमामेंट डेपो’ (शस्त्रे, हत्यारे इत्यादी सामग्री ठेवण्याची जागा) मध्ये एका सुरक्षारक्षकाने दुस-या सुरक्षारक्षकावर हल्ला करून त्याचा खून केल्याची घटना घडली. सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे स्वामिनाथन मणी (वय ५३) व विश्वामित्र सिंग (वय ५१) यांनी एकत्र बसून जेवण तसेच दारूचे सेवन केले. याच वेळी दोघांमध्ये किरकोळ विषयावरून वाद निर्माण झाल्यानंतर दोघात भांडण झाले. भांडण मिटल्यानंतर स्वामिनाथन ‘बरॅक’ मध्ये आराम करण्यासाठी निघून गेला, मात्र विश्वामित्र याने ‘बरॅक’ इमारतीच्या खाली येऊन स्वामिनाथनला खाली बोलवण्यास सुरुवात केली. स्वामिनाथन खाली येत नसल्याने विश्वामित्र वर जाऊन स्वामिनाथनला तो जबरदस्तीने खाली घेऊन आला. यानंतर पुन्हा दोघांत वाद निर्माण झाल्यानंतर रागाच्या भरात स्वामिनाथनने धारदार हत्याराने विश्वामित्रवर वार केले.
विश्वामित्र रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर स्वामिनाथन तेथून निघून गेला. त्यानंतर इतर सुरक्षारक्षकाबरोबरच स्वामिनाथन व विश्वामित्र यांची ड्युटी सुरू होणार असल्याने ड्युटीवर नियुक्त होणार असलेल्या सर्व सुरक्षारक्षकांना बोलवण्यासाठी त्यांचा सहकारी ‘बरॅक’ इमारतीकडे येत असताना इमारतीच्या बाहेर असलेल्या खुल्या जागेत विश्वामित्र रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांनी पाहिले. त्याला त्वरित चिखली उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. यानंतर संशयित स्वामिनाथन याला पोलिसांनी अटक केली. २०१९ या वर्षात वास्को शहरात घडलेल्या या तिन्ही खून प्रकरणांच्या मागे दारूच्या नशेचा संबंध असल्याचे यामुळे स्पष्ट होते. या तिनही खून प्रकरणांत आरोपपत्रे तयार करुन न्यायालयात दाखल केल्याची माहिती पोलिसांनी निरीक्षक नीलेश राणे यांनी दिली.