पणजी : आजारी असलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पर्याय म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार विनय तेंडुलकर, सभापती डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आली आहेत. या नावांविषयी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी गोवा फॉरवर्डचे मंत्री विजय सरदेसाई व मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याशी चर्चा केली.
सरदेसाई यांनी गोव्यातील सध्याची राजकीय स्थिती व गोमंतकीयांच्या अपेक्षा याविषयी शहा यांच्यासमोर भूमिका मांडली. विद्यमान सरकार पुढील साडेतीन वर्षे टिकेल, अशी हमी शहा यांनी सरदेसाई यांना दिली. ढवळीकर यांंनी खनिज खाणी लवकर सुरू व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. खातेवाटपाविषयीही चर्चा झाली.
मात्र, भविष्यात जर मुख्यमंत्रीपद कोणा नेत्याकडे सोपवायचे असेल तर ते देताना केवळ भाजपाच नव्हे तर साथ देणाऱ्या घटक पक्षांमधील ज्येष्ठ आमदारांचाही विचार व्हावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. बैठकीनंतर ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
काँग्रेसचे १४ आमदार नजरकैदफोडाफोडीला वाव राहू नये यासाठी काँग्रेसने आपल्या चौदाही आमदारांना कांदोळी येथील हॉटेलात ठेवले आहे. बुधवारी रात्री माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांच्या सिल्वर सॅण्ड हॉटेलमध्ये ते राहायला गेले होते. सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांच्यानंतर आणखी कोणीही आमदार भाजपाच्या गळाला लागू नये यासाठी काँग्रेसने ही खबरदारी घेतली. पक्षाचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार गोव्यात असून ते प्रत्येक राजकीय हालचालींवर बारीक लक्ष ठवून आहेत.