मडगाव - तब्बल 1.48 कोटीच्या जुन्या एक हजाराच्या नोटा गोव्यात वठविण्यासाठी आलेल्या कासरगो-केरळ येथील पाच जणांना गुरुवारी रात्री काणकोण येथील पोळे चेक नाक्यावर अटक केल्यानंतर या टोळीशी संबंध असलेल्या गोव्यातील तीन जणांना रात्री उशिरा अटक केली. त्यात फ्रान्सिस्को फर्नाडिस व मेल्वीन लोबो या कांदोळीच्या दोघांचा तर संजय खांडेपारकर या डिचोलीच्या एका संशयिताचा समावेश आहे.
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, तिघांनी केरळमध्ये जाऊन जुन्या नोटा केरळच्या संशयितांतर्फे गोव्यात आणल्या होत्या. या नोटा गोव्यात वठविण्याचे आश्वासन या तिघांनी केरळच्या टोळीला दिले होते. त्यानुसार त्यांच्यातील एक जण 7 जानेवारीच्या दरम्यान या तिघांबरोबर गोव्यात आला होता. मात्र गोव्यात या जुन्या नोटांना ग्राहक न मिळाल्याने त्यांना परत जाण्याचा सल्ला दिल्यानंतर त्याने आपल्या केरळातील आपल्या अन्य साथीदारांना बोलावून घेतले होते. या नोटा परत घेऊन जाताना काणकोणच्या पोळे चेक नाक्यावर त्यांना पकडले होते.
केरळातील संशयितांची नावे अब्दुल कादर (44), बी सलीम (33), रझाक मेहमद (45), अबुबकर सिद्दीकी (32) व बी. युसूफ (32) अशी असून सध्या ते काणकोण पोलिसांच्या ताब्यात आहेत. या संशयितांच्या मालकीची केएल 14 यू -3330 या क्रमांकाची गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. चेक नाक्यावर गस्तीसाठी असलेल्या भगवान सावंत या पोलीस शिपायाला संशयितांचा संशय आल्याने त्याने त्यांची कसून चौकशी करण्यास सूरू केल्यावर सगळे संशयित हडबडून गेले. पोलीस शिपाई सावंत याने आपल्या वरिष्ठांशी त्वरित संपर्क साधला. त्यानंतर सहाय्यक उपनिरीक्षक रमाकांत वेळीप यांनी या संशयितांना अटक केली.
या संबंधीची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी सकाळी पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी स्वत: काणकोणला भेट देऊन संशयितांची चौकशी केली. गोव्यात नोटा बदलून देणारी टोळी आहे का याचा आम्ही तपास करीतअसल्याचे गावस यांनी सांगितले. या कारवाईत उपअधीक्षक किरण पोडुवाल, पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी भाग घेतला. या सर्वाच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामचंद्र नाईक हे या प्रकरणात तपास करीत आहेत.