लोकमत न्यूज नेटवर्कवास्को: रेल्वे दुपदरीकरणाच्या विषयावरून वाद निर्माण झाल्यानंतर दक्षिण गोव्यातील वेळसांव येथे राहणारा व्यवसायिक ऐलीस्टन पिंटो (वय ३८) आणि त्याच्या दोन मित्रांना जबर मारहाण केल्याप्रकरणी वेर्णा पोलीसांनी शुक्रवारी (दि.२१) नऊ जणांना अटक केली आहे. ऐलीस्टनच्या नाकावर बाटलीने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलेला फ्रांन्सीस्को ब्रागांजा हा वेळसांव - पाळी - इर्सोशी पंचायतीचा पंच सदस्य असून त्या दहा जणांत त्यालाही अटक केली आहे.
पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिलेल्या माहीतीनुसार शुक्रवारी सकाळी वेर्णा पोलीसांनी त्या प्रकरणात गुन्हा नोंद करून नऊ जणांना अटक केली. दोन दिवसापूर्वी ऐलीस्टनचे वडील ‘गोयच्या रापोणकाराचो एकवट’ च्या बैठकीला गेले होते. तेथे त्यांच्याशी काहींनी वाद घालून त्यांना धक्का बुक्की केली अशी माहीती उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिली. आपल्या वडीलांना धक्का बुक्की केल्याचे ऐलीस्टनला समजताच त्यांनी गुरूवारी रात्री वेर्णा पोलीस स्थानकावर जाऊन त्याबाबत लेखी तक्रार दिली. त्यानंतर ऐलीस्टन आणि त्याचे मित्र क्रीस्तोदी रॉड्रीगीस आणि पाश्कोल रॉड्रीगीस वेळसांव चर्च जवळ असलेल्या एका व्यवस्थापनासमोर पोेचले असता एका गटाने त्यांना अयोग्यरित्या अडवून त्यांच्याशी वाद घालायला सुरवात केली. त्या गटात असलेल्यांच्या हातात काचेच्या बाटल्या, सुरी अशा प्रकारची काही हत्यारे होती अशी माहीती सलीम शेख यांनी दिली.
वाद घालायला सुरवात केल्यानंतर वेळसांवचे पंच सदस्य फ्रांन्सीस्को ब्रागांजा यांनी ऐलीस्टनच्या नाकावर काचेच्या बाटलीने हल्ला करून त्याला प्रथम गंभीर जखमी केला. तसेच अॅथ्नी डीमेलो यांने ऐलीस्टनवर सुरी फीरवली अन् केजी डीमेलो ने त्याला मुक्क्याने मारायला सुरवात केली. त्या गटातील इतरांनी ऐलीस्टनचे मित्र क्रीस्तोदी आणि पाश्कोल यांची जबर मारहाण केली अशी माहीती पोलीसांनी दिली. ऐलीस्टन आणि त्याच्या मित्रांची मारहाण केल्यानंतर त्यांनी तेथून पोबारा काढला. मारहाणीमुळे ऐलीस्टन आणि त्याचे मित्र गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले. पोलीसांना घटनेची माहीती मिळताच शुक्रवारी सकाळी त्यांनी ऐलीस्टनची तक्रार नोंद केली. ऐलीस्टन आणि त्याच्या मित्रांची मारहाण करण्यात शामील असलेल्या फ्रांन्सीस्को ब्रागांजा, अॅथ्नी डीमेलो, केजी डीमेलो, ज्योकींम फर्नांडीस, फेलीक्स विंन्सेंन्टी, रेमंण्ड फर्नांडीस, बाप्तीश डीमेलो, आग्नेलो फर्नांडीस, मिनीनो फर्नांडीस आणि अन्य अज्ञाताविरुद्ध वेर्णा पोलीसांनी भादस १४३, १४४, १४७, १४८, ३२३, ३२६ आरडब्ल्यु १४९ कलमाखाली गुन्हा नोंद करून त्या दहा जणांना अटक केली. मारहाणीच्या प्रकरणात शामील असलेल्या अन्य एकाला वेर्णा पोलीसांनी ताब्यात घेतले होते, मात्र त्याची प्रकृती ठीक नसल्याने नंतर त्याला नोटीस जारी करून सोडल्याची माहीती पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिली. ऐलीस्टन याची मारहाण केल्याने अटक केलेले ते नऊ जण वेळासांव भागातील रहीवाशी असल्याची माहीती पोलीसांनी दिली.
वेळसांव गावातील जास्तीत जास्त लोक रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाला विरोध करत आहेत. ऐलीस्टन आणि त्याचे वडील रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाला विरोध करत नसल्याने त्या गटाने ऐलीस्टन आणि त्याच्या मित्रांची मारहाण केल्याचे पोलीसांना प्रथम चौकशीत समजले आहे. मारहाणीत जखमी झालेला ऐलीस्टन आणि त्याच्या मित्राची प्रकृती सुधारत असल्याची माहीती पोलीसांनी दिली. वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक डायगो ग्राशियस यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.