बार्देस : बागा-कळंगुट येथे श्निवारी पहाटे सव्वासहा वाजण्याच्या सुमारास ३ शॅक्स, १ झोपडी व त्यात असलेल्या मच्छीमारीच्या छोट्या बोटीला आग लागून सुमारे ८० लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. हा घातपात असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आग लागल्याची माहिती म्हापसा, पिळर्ण व पणजी अग्निशामक दलाला मिळताच पिळर्ण दलाचे अधिकारी नामदेव धारगळकर तसेच जवान भारत गोवेकर, समीर शेट्ये, प्रशांत सावंत, धनंजय वस्त तसेच म्हापसा अग्निशामक दलाचे जवान महादेव राऊत, ख्रिस्तोफर डिसोझा, नरेंद्र शेट्ये, विष्णू राणे, राया वाय. नाईक, तसेच पणजीच्या जवानांनी मिळून तीन पाण्याचे बंब नेऊन आग विझविली. मिनिन डिसोझा, अॅँड्र्यू फर्नांडिस व डॉम्निक डिसोझा यांचे शॅक व डुमिंगो डिसोझा यांच्या झोपडीसह त्यात असलेल्या एका मच्छीमारी बोटीला आग लागून नुकसान झाले. आग प्रथम एका शॅकला लागली आणि नंतर त्याच्या बाजूला असलेल्या इतर दोन शॅक्सना लागून तीनही शॅक्स तसेच झोपडी व तेथील मच्छीमारीसाठी वापरण्यात येणारी छोटी बोट जळून खाक झाली. यामागे घातपाताचा संशय असावा, असे स्थानिक आमदार मायकल लोबो यांनी सांगितले. लोबो यांना शॅक्सना आग लागल्याची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन पाहणी केली. शॅक्स असोसिएशनचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज यांनी सांगितले की, आगीचे कारण निश्चित सांगता येणार नाही; पण सर्व शॅक्स हे तात्पुरत्या तत्त्वावर चालविले जातात. त्यामुळे त्यांचा विमा उतरविला जात नाही. पर्यटन खात्याने पुढाकार घेऊन सरकारकडून शॅक्स मालकांना आर्थिक साहाय्य मिळवून द्यावे. दरवर्षी अशा घटना घडतात; परंतु सरकार शॅकमालकांना कोणतेच आर्थिक पाठबळ देत नाही. (प्रतिनिधी)
बागा येथे तीन शॅक्स भस्मसात
By admin | Published: February 22, 2015 1:21 AM