लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: कुंडई औद्योगिक वसाहतीत एका फॅब्रिकेशन कंपनीत काम करणाऱ्या तीन कामगारांचा संरक्षक भिंत कोसळल्याने जागीच मृत्यू होण्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली आहे.
सविस्तर वृत्तानुसार, कुंडई औद्योगिक वसाहतीत साऊथन इंजीनियरिंग प्रोजेक्ट ही कंपनी कार्यरत असून, कंपनीच्या समोरच कामगारांना विश्रांती घेण्यासाठी एक शेड बनविण्यात आली आहे. कंपनीचे कामगार या शेडमध्ये विश्रांती घेत असतात. काही कामगार येथेच राहत असतात . रविवारी दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर चार कामगार विश्रांती घेत बसले होते. दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने संरक्षक भिंतींचा भाग कमकुवत बनला होता. रविवारी दुपारी मुसळधार पाऊस पडत असताना साडेतीनच्या दरम्यान मागची संरक्षक भिंत त्यांच्यावर कोसळली. त्या भिंतीखाली चिरडले गेल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. भिंत कोसळत असतानाचा आवाज कानावर पडल्याने एका कामगाराने तिथून पळ काढल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली.
मृतामध्ये मुकेश कुमार सिंग (वय ३८, मूळ बिहार), त्रिनाथ नायक (वय ४७ मूळ ओरिसा), दिलीप यादव (वय ३७ मूळ बिहार ) यांचा समावेश आहे. मातीच्या ढिगार्या खालून काढल्यानंतर त्यांना इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
सदर संरक्षक भिंत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन कामगारांच्या अंगावर पडलेले मोठे दगड व माती काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी एका मोठा दगडाच्या खाली दोन कामगार चिरडल्याचे आढळून आले. तर एक कामगार आणखी एका दगडा खाली मृत्युमुखी पडला होता. सदर दगड व माती काढण्यासाठी अक्षरशः जेसीबी मशीन चा वापर करावा लागला.
म्हार्दोळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक योगेश सावंत यांनी त्वरित घटनास्थळी घेऊन मदत कार्यात मदत केली. फोंडा अग्निशामक दलाचे अधिकारी सुशील मोरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक दलाने मदत कार्यात मदत केली.
कानात इअरफोन आणि काळाने डाव साधला
तीनही कामगार जेवण झाल्यानंतर मोबाईलवर आपल्या कानात इयरफोन लावून व्हिडिओ व गाणी ऐकत होते. ज्यावेळी संरक्षक भिंत कोसळत होती, त्यावेळी कानात इएरफोन असल्यामुळे तो आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. ज्या कामगाराला भिंत पडत असल्याचा आवाज आला, त्याने पटकन उडी मारल्याने तो बचावला. थोडक्यात कानात इयरफोन असल्याने या तीन कामगारावर काळाचा घाला पडला.