लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: कोविड महामारी अजून गेलेली नाही, परंतु तशातच एच३एन२ या विषाणूने डोकेवर काढल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. दिल्लीत या संसर्गाने बळी घेतले आहेत. तसेच गोव्याच्या सीमेपलिकडील महाराष्ट्रातही हा विषाणू येऊन ठेपला आहे, या पार्श्वभूमीवर गोवेकरांनी खबरदारी घेण्याची वेळ आली आहे.
काय आहे एच 3 एन २? स्वायन फ्लू आपल्याला माहीत आहे. हा एक इन्फ्लुएन्झा असून यापूर्वी तो एच १ एन १ या नावाने ओळखला जायचा. गोव्यानेही या विषाणूचा सामना यापूर्वी केला आहे. हाच विषाणू म्यूट होऊन एच ३ एन २ बनून परतला आहे.
संसर्ग कसा ओळखायचा?
या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर २ ते ३ आठवड्यापर्यंत लक्षणे आढळतात. खूप ताप, तीव्र अंगदुखी, डोकेदुखी, सर्दी, खोकला, नाकातून पाणी वाहणे आणि श्वसनाचा त्रास होणे ही या रोगाची लक्षणे आहेत. याशिवाय लहान मुलांमध्ये जुलाब, उलट्या आणि जठरासंबंधित समस्या दिसू शकतात. ताप कमी झाला तरी खोकला आठ-दहा दिवस राहतो.
या लोकांनी सावध रहावे....
या रोगाचा संसर्ग कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो. परंतु गर्भवती महिला, पाच वर्षांपेक्षा लहान मुले आणि म्हाताच्या लोकांना याचा अधिक धोका संभवतो, अशी माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आली.
कोविडचा भाऊ
संसर्गाच्या बाबतीत हा विषाणू कोविडसारखाच आहे. कोविड संसर्गाची तीव्रता अधिक आणि याची जरा कमी इतकाच काय तो फरक. त्यामुळे गर्दी टाळणे, गर्दीच शिरलेच तर मास्क वापरणे, डोळे आणि नाक यांना वारंवार स्पर्श न करणे, हात-पाय स्वच्छ धुणे ह्याच खबरदारी घ्याव्या लागतील.
औषधोपचार
- या रोगाचा संसर्ग झाल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही. परंतु इंटरनेट सर्च करून स्वतःच डॉक्टर बनून औषधे घेणे टाळावे. डॉक्टरच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावेत.
- ताप, सर्दी सारखी लक्षणं आढळल्यास रुग्णांनी पुरेशी विश्रांती घ्यावी. तसेच शरीर चांगले हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे.
चाचण्या सुरू झाल्या
गोव्यात अद्याप एकही एच ३ एन २ चा बाधित आढळला नाही, परंतु आरोग्य खात्याकडून खबरदारी घेतल्या जात आहेत. इन्फ्ल्युएन्झा संबंधीच्या रुग्णाची एच ३ एन २ ची शक्यता घेऊनही तपासणी केली जाते. शंका असलेल्यांचे नमुने घेऊन चाचणी केली जात आहे. -डॉ. प्रशांत सूर्यवंशी, साथ रोग विभाग प्रमुख, आरोग्य खाते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"