डिचोली : बंजी जंपिंगचा अनोखा आणि थरारक अनुभव घेण्याची संधी गोमंतकीयांना प्राप्त झाली असून, उत्तर भारतात ऋषिकेश येथे या प्रकारच्या साहस क्रीडेचे आयोजन गेली ९ वर्षे करणा-या ‘जंपिंग हाइट्स’ या आस्थापनाने मये तलावानजीक बंजी जंपिंगचा प्रकल्प उभारला असून, त्याचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ५५ मीटरची बंजी जंप येथे १२ ते ४० या वयोगटातील साहसवीरांना घेता येईल. त्यासाठी माणसी रु. ४८०० आकारले जाणार असून इच्छुकांना वयाचा पुरावा दाखवावा लागेल. तसेच उडी घेण्याआधी आवश्यक शारीरिक चाचणी घेतली जाईल. ऋषिकेश येथे तब्बल ८०,००० उड्यांचा प्रदीर्घ अनुभव आयोजकांपाशी असून, गोव्यातील प्रकल्प न्यूझीलंड येथील तज्ज्ञ प्रशिक्षकांद्वारे हाताळला जाईल. येथील कर्मचा-यांना सुरक्षाविषयक दीर्घ प्रशिक्षण दिल्याची माहिती जंपिंग हाईट्स राहुल निगम यांनी दिली. गोवा पर्यटन विकास महामंडळाचे पाठबळ असलेला हा प्रकल्प माजी सैनिकांद्वारे चालवला जाणार आहे.
गोव्यात सुरू झालाय ‘बंजी जंपिंग’चा थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 9:57 PM