लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: मूळ केरळ येथील एका मनोरुग्ण व्यक्तीने आत्महत्येचे धमकी देत इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एक थरार निर्माण केला. परंतु चौकस असलेल्या पोलिसांनी त्याला शेवटी शिताफिने पकडले.
सविस्तर वृत्तानुसार, फोंडा नगरपालिकेच्या मार्केट कॉम्प्लेक्स च्या मागच्या बाजूला असलेल्या एका खाजगी इमारतीवर केरळ येथील एक मनोरुग्ण व्यक्ती चढला होता. प्रत्येक वेळी तो खाली उडी मारण्याचे भासवत होता. लोकांना वाटले की तो खरेच उढी टाकेल.धोका नको म्हणून यासंदर्भात लगेचच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल अब्दुल सत्तार हे पोलीस चालक विदेश मार्दोळकर यांच्यासह सदर इमारतीवर लगेचच दाखल झाले. त्यांनी त्या मनोरुग्ण व्यक्तीकडे संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता प्रत्येक वेळी तो एक पाऊल उभे करून खाली उडी टाकण्याचा पवित्रा घ्यायला लागला.
मनोरुग्ण असल्याने कदाचित त्याचा तोल जाऊन तो खाली पडू शकतो याचा अंदाज पोलिसांना एव्हाना आला होता. त्यांनी त्या व्यक्तीला बोलण्यात व्यस्त ठेवले. मध्येच खाली काहीतरी आवाज करण्यात आला. त्यावेळी त्या मनोरुग्ण व्यक्तीने खाली पाहण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली व त्याला पकडले.
फोंडा येथील सब जिल्हा इस्पितळात त्याला दाखल करण्यात आले. सदरची घटना जरी मनोरुग्न व्यक्तीशी निगडित असली तरी पोलिसांनी दाखवलेल्या चौकसपणा मुळे त्याचा प्राण वाचू शकले. यामुळे सदर दोन्ही पोलिसांचे फोंडा शहरात अभिनंदन होत आहे.