वास्को: गेल्या दोन महिन्यांपासून दक्षिण गोव्यातील मुरगाव नगरपालिकेचे राजकारण बरेच रंगले असून ह्या पालिकेतील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी आता दुसऱ्यांदा गुरुवारी (४) बैठक बोलवण्यात आलेली आहे. ह्या बैठकीत काय होणार याच्यावर सर्वांचेच लक्ष वेधून राहिलेले आहे. २६ जून रोजी मुरगाव नगरपालिकेचा नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी बोलवण्यात आलेल्या बैठकीत ऐन वेळी निर्वाचन अधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी आजाराचे कारण पुढे ठेवून अनुपस्थिती लावल्याने ती बैठक रद्द करण्यात आली होती. निर्वाचन अधिका-याने राजकीय दबावाखाली येऊन जाणूनबुजून अनुपस्थिती लावल्याचा आरोप नंतर काही नगरसेवकांनी केला असून, गुरुवारी सकाळी ११.३० वाजता नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी बोलवलेल्या बैठकीय काय होणार याबाबत विविध प्रकारचे तर्कवितर्क काढण्यात येत आहेत.मुरगाव नगरपालिकेचे यापूर्वीचे नगराध्यक्ष क्रितेश गावकर व उपनगराध्यक्ष शशिकांत परब यांच्याविरुद्ध काही काळापूर्वी अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर पहील्यांदा २६ जून रोजी नवीन नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती. ह्या बैठकीपूर्वी दोन्ही पदासाठी अर्ज भरण्याच्या काळात नगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक नंदादीप राऊत, यतीन कामुर्लेकर, सैफुल्ला खान व रोचना बोरकर यांनी आपला अर्ज सादर केला होता. उपनगराध्यक्ष पदासाठी रिमा सोनुर्लेकर, श्रीधर म्हार्दोळकर, लीयो रॉड्रीगीस व मुरारी बांदेकर यांनी अर्ज भरला होता. २६ जून सकाळी ११.३० वाजता सदर बैठक बोलवण्यात आल्यानंतर त्या बैठकीस मुरगाव पालिकेतील सर्व नगरसेवकांनी तसेच मुख्याधिकारी गौरीश सांखवाळकर यांनी उपस्थिती लावली.ह्या बैठकीला निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित राहणार असलेले मडगावचे मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांची वाट पाहण्यात येत असताना ऐन वेळी त्यांनी मुख्याधिका-यांना संपर्क करून आजारी असल्याचे कारण पुढे ठेवून सदर बैठकीस ते अनुपस्थित राहीले. हा प्रकार घडल्यानंतर ह्या बैठकीत नगराध्यक्ष म्हणून निवडून येणार असल्याची दाट शक्यता निर्माण झालेल्या नगरसेवक नंदादीप राऊत यांच्या समर्थक नगरसेवकांनी निर्वाचन अधिकारी सिद्धीविनायक नाईक राजकीय दबावाखाली येऊन जाणून बुजून खोटे नाटक करून बैठकीस अनुपस्थित राहील्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच त्यांच्याविरुद्ध कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी ह्या नगरसेवकांकडून तेव्हा करण्यात आली होती.सदर पालिकेत वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांचे समर्थन असलेले नगरसेवक नंदादीप राऊत नगराध्यक्ष व रिमा सोनुर्लेकर उपनगराध्यक्ष बनण्याची तेव्हा दाट शक्यता निर्माण होऊन निर्वाचन अधिका-याने ह्या बैठकीला अनुपस्थिती लावल्याने आमदार आल्मेदा यांनी सुद्धा त्यांच्या विरुद्ध आरोप करून त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती. नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी पहिल्यांदा बोलवलेली बैठक रद्द झाल्यानंतर मुरगाव नगरपालिकेतील राजकारण बरेच तापून संपूर्ण गोव्यात हा चर्चेचा विषय ठरल्याचे दिसून आले. यानंतर मुरगाव पालिकेतील रिक्त असलेल्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवड करण्यासाठी गुरुवारी (दि.४ जुलै) पुन्हा बैठक बोलवण्याचे पालिका संचालक डॉ. तारीक थोमस यांनी जाहीर केले. सदर बैठकीला खुद्द पालिका संचालक तारीक थोमस निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित राहणार असून निवडणुकीच्या प्रकारात कुठलीच अनुचित घटना न घडावी यासाठी त्यांनी कदाचित हा निर्णय घेतला असावा असे सध्या बोलण्यात येत आहे.गुरूवारी सकाळी ११.३० वाजता बैठकीला सुरवात होणार असून नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष पदासाठी पहील्या बैठकीच्या पूर्वी दाखल केलेलेच अर्ज मान्य करण्यात आलेले आहेत. यामुळे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नगरसेवक नंदादीप राऊत, यतीन कामुर्लेकर, सैफुल्ला खान व रोचना बोरकर तर उपनगराध्यक्ष पदासाठी रिमा सोनुर्लेकर, श्रीधर म्हार्दोळकर, लीयो रॉड्रीगीस व मुरारी बांदेकर रिंगणात आहेत. निवडणूकीची बैठक सुरू झाल्यानंतर सुरवातीला आपला अर्ज मागे घेण्यासाठी काही वेळ देण्यात येणार असून ह्या वेळेत काही नगरसेवक नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष पदाचे आपले अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. मुरगाव नगरपालिकेत होणार असलेल्या ह्या निवडणूकीत पुढचा नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष कोण बनणार याबाबत नागरीकात चर्चा चालू असून निकाल जाहीर झाल्यानंतरच ते स्पष्ट होणार आहे.नगरसेवक नंदादीप राऊत मुरगाव पालिकेचे ५१ वे नगराध्यक्ष बनण्याची दाट शक्यतागुरूवारी (दि.४) मुरगाव नगरपालिकेत निवडून येणारा नगराध्यक्ष ह्या पालिकेच्या इतिहासातील ५१ वा नगराध्यक्ष असणार असून हा मान कोणाला मिळणार याबाबत नागरीकात विविध प्रकारची चर्चा सध्या चालू आहे. मागील काही दिवसापासून चालू असलेल्या पालिकेतील राजकीय हालचाली पाहील्यास वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांचे समर्थन असलेले नगरसेवक नंदादीप राऊत मुरगाव पालिकेचे ५१ वे नगराध्यक्ष बनणार असल्याची जास्त शक्यता निर्माण झालेली आहे. तसेच आमदार आल्मेदा यांचे समर्थन असलेली नगरसेविका रिमा सोनुर्लेकर मुरगाव नगरपालिकेतील पुढच्या उपनगराध्यक्षा बनणार असल्याचे सध्याचे चित्र असून खरे काय ते निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.मुरगाव नगरपालिकेतील नगराध्यक्ष - उपनगराध्यक्षाची निवडणूक बनली आहे भाजप विरूद्ध भाजप लढतगुरूवारी होणार असलेल्या मुरगाव नगरपालिकेतील नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीवर सर्वांचेच लक्ष वेधून राहीले आहे. यामागचे कारण म्हणजे सदर निवडणूक भाजप आमदार तथा नगरविकासमंत्री मिलींद नाईक यांचे समर्थन असलेले नगरसेवक विरुद्ध वास्कोचे भाजप आमदार कार्लुस आल्मेदा यांचे समर्थन असलेल्या नगरसेवकात होणार आहे. नगरविकासमंत्री मिलींद नाईक यांचे समर्थन असलेले क्रितेश गावकर व शशिकांत परब यांना नगराध्यक्ष - उपनगराध्यक्ष पदावरून काही काळापूर्वी खाली पाडण्यात आले असून त्यांच्यावर अविश्वास ठराव संमत करणाºया नगरसेवकात आमदार कार्लुस यांचे समर्थन असलेल्या नगरसेवकांचा महत्वाचा वाटा होता. यानंतर ह्या पदांची निवड करण्यासाठी पहील्यांदा बोलवण्यात आलेल्या बैठकीत निर्वाचन अधिकारी अनुपस्थित राहील्यानंतर ते राजकीय दबावाखाली येऊन अनुपस्थित राहीले असल्याचा आरोप करून यात नगरविकासमंत्री मिलींद नाईक यांचा हात असण्याचा संशय सुद्धा आमदार आल्मेदा यांनी व्यक्त केला होता. एवढेच नव्हे तर मिलींद नाईक यांचे नगरविकासमंत्री पद काढून घ्यावे अशी मागणी सुद्धा आमदार कार्लुस आल्मेदा यांच्याकडून करण्यात आली होती. मागच्या काही दिवसात मुरगाव नगरपालिकेतील राजकारण पाहील्यास गुरूवारी होणार असलेली निवडणूक भाजप विरुद्ध भाजप होणार असेच म्हणावे लागणार
मुरगाव नगरपालिकेतील नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी गुरूवारी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 8:15 PM