लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : साळगावचे माजी आमदार तथा माजी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी लोकसभेच्या तिकिटाबद्दल पुन्हा एकदा दावा करताना 'पक्षाकडे तिकीट मागणे हा गुन्हा नव्हे. बुथवरील साध्या कार्यकर्त्याला उद्या निवडणूक लढवावीशी वाटली तर त्यात काहीच गैर नाही', असे म्हटले आहे.
तिकिटावरील आपल्या दाव्याचे समर्थन करताना परुळेकर यांनी पुढे असाही पुनरुच्चार केला की, पक्ष जर श्रीपाद नाईक यांना उमेदवारी देत नसेल तर ती मलाच मिळायला हवी. श्रीपाद यांना पक्षाने बाजूला काढल्यास तिकिटावर माझाच हक्क पोहोचतो, कारण पक्षात मी ज्येष्ठ आहे. १९९९च्या आधीपासून मी पक्षासाठी एकनिष्ठेने काम केले. मंडल अध्यक्ष म्हणून जबाबदारी हाताळली. पक्षाने मला आमदार, मंत्री बनवले. पक्षाने सदस्य मोहीम राबवली, त्याचा मी प्रमुख होतो.
गोव्यात ४ लाख ७० हजार सदस्य केले. तसेच माजी केंद्रीय संरक्षणमंत्री तथा माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या षठ्यब्दीपूर्ती सोहळ्याच्या आयोजनाची जबाबदारी माझ्यावर होती तेव्हा संपूर्ण राज्यात मी फिरून बैठका घेतल्या होत्या. उत्तर गोव्यातच नव्हे तर संपूर्ण गोवाभर कार्यकर्त्यांच्या संपर्कात मी आहे. सध्या आमदार नसलो तरी मी माझे काम चालूच ठेवले आहे. उपाध्यक्ष म्हणून तसेच पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली असल्याचे परुळेकर म्हणाले.
अजून काहीजण रांगेत...
श्रीपाद नाईक यांना वयस्कर संबोधून विश्रांतीचा सल्ला देणे योग्य नव्हे. भाजपात राष्ट्रीय स्तरावर तसेच गोव्यातही त्यांच्यापेक्षा वयस्कर नेते आहेत. श्रीपादभाऊंनी इच्छुकांना 'नवरे' संर्बोधले यातही मला त्यांची काही चूक वाटत नाही, लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. येत्या एप्रिल-मे पर्यंत ती होईल. त्यामुळे येणाऱ्या काळात आणखीही तिकिटोच्छुक पुढे येतील, असेही परुळेकर म्हणाले.