लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : लोकसभा निवडणुकीवेळी मला जर उत्तर गोवा मतदारसंघातून भाजपने तिकीट दिले तर मी निश्चितच जिंकेन, असा विश्वास माजी मंत्री दिलीप परुळेकर यांनी काल व्यक्त केला. मी लोकसभा निवडणुकीच्या विषयाबाबत चर्चा करण्यासाठी लवकरच भाजपच्या केंद्रीय नेत्यांना भेटेन, असेही परुळेकर यांनी जाहीर केले.
मी भाजपचा एकनिष्ठ सैनिक आहे. भाजप कधीच सोडला नाही. कधी काँग्रेस किंवा तृणमूल काँग्रेस पक्षातही गेलो नाही. यापुढेदेखील दुसऱ्या कोणत्या पक्षात जाण्याची माझी इच्छा नाही व माझ्यावर तो प्रसंगही येणार नाही. मी कायम निष्ठेने भाजपचे काम केले आहे. पक्ष सांगेल ते काम करत आलो आहे, असे परुळेकर म्हणाले. मी कायम भाजपचाच जयजयकार करीन, मी दुसऱ्या कोणत्याच पक्षात जाणार नाही, असे परुळेकर म्हणाले.
श्रीपाद नाईक यांच्याविषयी लोक विविध चर्चा करतात. मला भाऊंविषयी आदर आहे. मला लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा आहे, कारण राजकारणी आहे. अनेक वर्षे भाजपमध्ये काम करत आहे. भाजप मला जे काही सांगेल ते करीन. जर मला भाजपने तिकीट दिले तरच लोकसभा निवडणूक लढवीन, असेही परुळेकर यावेळी बोलताना म्हणाले.
मला माझे कार्यकर्ते निवडणूक लढविण्याची विनंती करतात. मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनीही कायम भाजपचे काम केले. आम्ही जे काम केले ते पूर्ण गोव्याला ठाऊक आहे, असे सांगून परुळेकर म्हणाले की, कोणत्याही राजकीय नेत्यांकडे स्वत:ची ओळख हवीच. आमदार किंवा सरपंच किंवा मंत्री म्हणून स्वतःची ओळख हवी. जर श्रीपाद नाईक यांना भाजपने तिकीट दिले नाही व मला तिकीट दिले तर मी निश्चितच लढेन, असे परुळेकर म्हणाले. श्रीपादभाऊंना भाजपने तिकीट दिले तर भाऊ जिंकतील व मला दिले तर मी जिंकेन, असेही परुळेकर म्हणाले.
श्रीपाद नाईक यांना काहीजणांनी उद्घाटन सोहळ्यांवेळी डावलण्याचा प्रयत्न केला. जुवारी पुलाच्या उद्घाटनाच्या वेळीही काहीजणांनी भाऊंना हवे ते महत्त्व दिले नाही. यामुळे गोव्यातील लोकांत संभ्रम निर्माण झाला. भाऊंनी पाच-सहा वेळा खासदार कार्यकाळ पूर्ण केला आहे. आता त्यांना भाजप तिकीट देणार नाही, अशी अफवा लोकांमध्ये पसरली. यामुळे मला कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची विनंती केली, असे परुळेकर म्हणाले.