लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : महाराष्ट्राला तिळारीचे पाणी कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकात वळवता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली आहे. गोव्याला विश्वासात न घेता तिळारी धरणाच्या धामणे शीर्ष धरणात भंडुरा नाल्याचे पाणी आणून ते कर्नाटकामध्ये नेण्यासाठी प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे गोव्याच्या वाट्याचे पाणी पळवण्यात येणार असल्याचे वृत्त दैनिक लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी भूमिका व्यक्त केली आहे.
तिळारी धरण प्रकल्प हा गोवा आणि महाराष्ट्र यांचा संयुक्त प्रकल्प असून सरकारने महाराष्ट्रशी करार करून गोव्याला जलसिंचन व पेयजलाचा आवश्यक पुरवठा व्हावा म्हणून त्यावेळी धरणाची योजना आखलेली होती. या प्रकल्प अंतर्गत गोव्याला पिण्यासाठी, जलसिंचनासाठी पाणी पुरवण्यात येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
गोवा सरकारने धरणाच्या संदर्भात कालव्यांची दुरुस्ती व इतर कामे नियमितपणे केलेली आहेत. मध्यंतरी वारंवार दुभंगणारे कालवे व त्यामुळे जलपुरवठ्यावर होणारा परिणाम यामुळे सुमारे २०० कोटींची विशेष योजना आखून पाईपलाईनद्वारे पाणी गोव्याच्या हद्दीत आणण्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे. काही तांत्रिक बाबींमुळे तो अद्याप चालीस लागलेला नाही मात्र कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र तिळारीचे पाणी कर्नाटकाला वळवू शकत नाही. गोव्याला विश्वासात घेतल्याशिवाय अशाप्रकारे निर्णय घेणे पूर्णपणे चुकीचे ठरेल, असे स्पष्ट करताना मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव अशक्य असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकल्पावरून पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
तर तो प्रस्तावच चुकीचा
या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडताना महाराष्ट्र अशाप्रकारे कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. कारण प्रकल्पासंदर्भात गोवा-महाराष्ट्र यांच्यात रितसर करार झालेला आहे. गेली अनेक वर्षे गोव्यामध्ये पाणी सातत्याने पुरवले जात आहे. त्यामुळे अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव असेल तर तो पूर्णपणे चुकीचा असल्याचे मत मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केले.
काय आहे योजना?
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामधील आणि कणकुंबीपासून काही अंतरावर असलेल्या लोणी येथे धरण प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. त्यात पाणी सोडून नंतर त्या पाण्याची उचल बैलूर येथे उगम पावणाऱ्या मार्कंडेय नदीपात्रात नेण्याचा द्राविडी प्राणायाम अखंड झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. या प्रकल्पातून महाराष्ट्र व कर्नाटकाला पाणीपुरवठा करण्याची योजना आहे. महाराष्ट्र व कर्नाटकाने धामणे जलाशयातून बेळगावसाठी राकोस्कोप जलाशयात पाणी देण्यासाठी योजना आखलेली आहे. जलाशयात येणारे पाणी किती प्रमाणात जाणार यासंदर्भात अद्याप अनिश्चितता आहे.
गोव्याच्या ना हरकत दाखल्याशिवाय काहीच होऊ शकणार नाही
तिळारीसाठी महाराष्ट्र व कर्नाटकने हात मिळवणी केली असली तरी गोवा सरकारने ना हरकत दाखला दिल्याशिवाय तेथे काहीच करता येणार नाही, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले. धामणे जलाशयातून बेळगावला पाणी नेण्याचा जो डाव कर्नाटकने आखला आहे. त्याबद्दल विचारले असता ते बोलत होते. मंत्री शिरोडकर म्हणाले की, कोणतेही काम करायचे झाल्यास गोवा सरकारचा ना हरकत दाखला घ्यावा लागेल. तसा करार महाराष्ट्र व गोवा यांच्यात हा प्रकल्प उभारताना झाला होता. दरम्यान, धामणे शीर्ष धरणात भंडुरा नाल्याचे पाणी आणून ते कर्नाटकात नेण्याचा डाव असल्याचे वृत्त आहे. आम्ही दाखला देणार नाही तोपर्यंत तेथे काहीच होणार नाही, असे शिरोडकर म्हणाले.