लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पणजीतील खासगी बसेस १९ डिसेंबरपर्यंत काढून त्यांची जागा कदंबच्या इलेक्ट्रिक बसेस घेतल्या जाणार नाहीत, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्याचे खासगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताहाणकर यांनी सांगितले.
या बसेसच्या विषयावर लवकरच वाहतूक खाते, स्मार्ट सिटी अधिकारी व स्थानिक आमदारांची संयुक्त बैठक बोलावून तोडगा काढला जाईल. या बैठकीत निर्णय होईपर्यंत खासगी बसेस पणजीत कार्यरत राहतील असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. ताह्मणकर म्हणाले की, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पणजी दोनापावला मिरामार- ताळगाव - बांबोळी या मार्गावर केवळ कदंबच्या इलेक्ट्रिक बसेस धावतील. सध्या सुरू असलेल्या ७० खासगी बसेसची वाहतूक सेवा १९ जानेवारीपासून बंद केली जाईल, असे परिपत्रक वाहतूक खात्याने जारी केले आहे.
खात्याचे हे परिपत्रक अन्यायकारक आहे. या बसेस पैकी बहुतेक बसेस या पोर्तुगीज काळापासून कार्यरत आहेत. या बसेस बंद झाल्यानंतर त्यावर अवलंबून असलेल्या चालक व वाहकांच्या कुटुंबाचे काय ? असा प्रश्न करून खात्याच्या या निर्णयाला आम्ही आक्षेप नोंदवला आहे; मात्र या आक्षेपाची वाहतूक खात्याने कुठलीही दखल घेतली नसल्याची टीका ताम्हणकर यांनी यावेळी केली.
याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत बैठक झाली. यात त्यांनी या विषयावर योग्य तो तोडगा काढेपर्यंत पणजीतील खासगी बसेसची वाहतूक सेवा बंद केली जाणार नाही, असे आश्वासन दिले. त्यासाठी त्यांचे आभार आहेत. राज्यात आज सक्षम विरोधकांचा अभाव असल्याने एकतर लोकांना मुख्यमंत्र्यांकडे किंवा न्यायालयात न्याय मिळवण्यासाठी धाव घ्यावी लागते अशी टीका ताह्मणकर यांनी केली.