पणजी - अजून मार्च किंवा एप्रिल-मे महिना आलेला नाही पण आतापासूनच राज्यात विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. डिचोलीत लोकांना घागर मोर्चा काढावा लागतो तर म्हापशात स्थानिक आमदार तथा मंत्री फ्रान्सिस डिसोझा हेही पाणी प्रश्नामुळे त्रस्त आहेत. सरकार मात्र चोवीस तास पाणी पुरविण्याच्या घोषणा गेली पाच वर्षे करत आहे. मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी आपण गेली वीस वर्षे म्हापसा मतदारसंघाचे आमदार आहोत व वीस वर्षे म्हापशातील नळाच्या पाण्याचाच प्रश्न सोडविण्यासाठी काम करतोय पण अजुनही तो प्रश्न सुटत नाही, असे बुधवारी येथे लोकमतला सांगितले.
आरोग्याच्या कारणास्तव तीन महिने विश्रंती घेतल्यानंतर डिसोझा हे आता सरकारी कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ लागले आहेत. बुधवारी त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीतही भाग घेतला. डिसोझा म्हणाले, की नळाद्वारे लोकांना निदान पिण्याचे पाणी तरी व्यवस्थित मिळायला हवे. चोवीस तास पाणी देणो सोडा, सहा तास तरी पाणी मिळायला हवे. तीन तास तरी पाणी पुरवठा व्हायलाच हवा. म्हापशात पाण्याची समस्या तीव्र आहे. सोळा एमएलडी पाणी दिले तरी, ते म्हापशाला पुरणार नाही. या मतदारसंघात एकूण एकवीस हजार घरे आहेत.
नगर विकास मंत्री असलेले डिसोझा म्हणाले, की आपण वीस वर्षे पाण्याच्या समस्येला सामोरे जात आहोत. सातत्याने आपण तो प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतोय. मात्र अजुनही पिण्याच्या पाण्याची नीट व्यवस्था झालेली नाही. अधूनमधून समस्या सुरूच असते. म्हापशात व्यवसायिक उपक्रम वाढले आहेत. शहराचा विस्तार होत आहे. व्यापार, व्यवसायासाठीही पाणी लागतेय. शंभर फ्लॅट असलेल्या इमारती बांधल्या जातात तेव्हा ते बांधकाम करण्यासाठी देखील सगळे नळाचे पाणी वापरले जाते. बांधकाम करण्यासाठी पाणी साठवून ठेवले जाते.
डिसोझा म्हणाले, की तिळारी धरणाचे तरी थोडे पाणी येतेय म्हणून बरे झाले. वास्तविक ते पाणी शेतीसाठी वापरावे असे ठरले होते पण शेतीऐवजी पिण्यासाठीच ते वापरले जात आहे. कारण पिण्यासाठीच वापरणो ते गरजेचे बनले आहे. नळ कोरडे बनले व पाणीच घरात आले नाही तर लोक हैराण होतात.