नारायण गावस,पणजी: राज्यातील कानाकोपऱ्यातून ऊस उत्पादक शेतकरी आंदोलन करीत असून ह्याला अकार्यक्षम सरकार जबाबदार आहे. सरकारने या आधीही इथेनॉल प्लांट सारखे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनाला वाव देऊन, न्याय देणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु अजूनपर्यंत ती आश्वासने पूर्ण झालीच नाही.
डबल इंजिनच्या या सरकारला एक ऊसाचा कारखाना घालता येत नाही. सरकारच्या अशा मंत्री आमदारांना घरी बसविण्याची वेळी आली आहे, असे मनोज परब यांनी आझाद मैदानावर निदर्शने करणाऱ्या ऊस उत्पादकांना पाठींबा देताना सांगितले.
राज्य सरकारचे लक्ष आता शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर असून, राज्यातील हे डबल इंजिन सरकार शेतकऱ्यांना रस्त्यावर आणून त्यांना निराश करण्याचे प्रयत्न करीत आहेत. जेणेकरून शेतकरी हतबल होऊन, आपली जमीन सोडून देतील आणि सरकारला ती जमीन बिल्डर लॉबीच्या घशात घालण्यास संधी मिळेल. सांगे तालुक्यात आयआयटी च्या नावाखाली जमिनी हडपल्या जातात, काणकोण मध्ये फिल्म सिटी च्या नावाखाली इतर बाजूच्या जमिनी हडपण्यासाठी हे सर्व डावपेच आखण्यात येत असल्याचे मनोज परब म्हणाले.
आज राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे राहिले नाही, गोवेकरांचे राहिले नाही. हे सरकार दिल्लीवासियांचे , मोठ मोठ्या बिल्डर लॉबीचे असून आम्ही आमच्या आरजी पक्षाच्या आमदाराकडून सरकारवर येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात दबाव टाकणार असल्याचेही मनोज परब म्हणाले.
कारखान्यावर अवलंबून असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर ह्या पक्षाची, ह्या सरकारची औकात काय आहे ते दिसून येते. आज राज्यात हे सरकार पूर्णपणे अकार्यक्षम, अपयशी ठरले असून, ह्या सरकारला उन्मळून फेकण्याची वेळ आलेली आहे. ह्या गोवेकर विरोधी बीजेपी सरकारला आणि त्यांचे आमदार, मंत्री - खासदारांना कायमचे घरी बसवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मनोज परब म्हणाले.