लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शाळांच्या वेळेत १५ मिनिटांनी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ सकाळी आठऐवजी ७.४५ वाजता शाळा सुरू करून करण्याचा किंवा संध्याकाळी जादा वर्ग घेऊन करण्याचे पर्याय शाळांना देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, शिकवण्याच्या तासांची संख्या वाढली आहे. त्याची माहितीही विद्यालयांना देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून शालान्त मंडळाला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सकाळच्या प्रार्थनेची वेळ आणि मधली सुट्टी वगळून ५.३० तासांचे शिक्षण अपेक्षित आहे. त्यासाठी सकाळी शाळा ८ ऐवजी ७.४५ वाजता सुरू करणे हा एक पर्याय देण्यात आला आहे. किंवा संध्याकाळच्या सत्रात वर्ग घेऊन शिकविण्याचे तास वाढविण्याचाही पर्याय देण्यात आला आहे. कारण नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांचे विषय वाढले आहेत आणि तासिकाही वाढल्या आहेत.
अशा असतील तासिका
राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार, प्रत्येक वर्गाचा कालावधी ५० मिनिटांचा असावा, सध्या ३५ मिनिटांच्या तासिका आहेत. नवीन शैक्षणिक वर्षात ४० मिनिटांच्या तासिका करण्यात याव्यात, अशी सूचना शिक्षण धोरण अंमलबजावणी समितीने केली आहे. नवीन शिक्षण धोरणाचा राज्यात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत अंमलबजावणी होत असल्यामुळे यंदा केवळ नववी इयत्तेला ही नियमावली लागू असेल. त्यामुळेच शाळेची १५ मिनिटे वाढविण्यात आली आहेत.
८० शिक्षक प्रशिक्षणासाठी बंगळुरूला
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षकांची भूमिका ही सर्वात महत्तवाची आहे. त्यामुळे शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. राज्यातील माध्यमिक विद्यालयांतील विज्ञान विषयाचे ४० आणि गणित विषयाचे ४० असे मिळून ८० शिक्षकांना बंगळूरू येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेकडून १० दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जून महिन्यात हे प्रशिक्षण असेल अशी माहिती धोरण अंमलबजावणी समितीचे सदस्य जे. आर. रिबेलो यांनी दिली.
तर शाळा ७.४५ वाजता भरणार
शिकवणीचे तास कोणत्या पद्धतीने वाढवावे हे स्वातंत्र्य विद्यालयांना देण्यात आले आहे. परंतु विद्यालयांनी सविस्तर वेळापत्रक करून गोवा शालान्त मंडळाला सादर करावे लागेल किंवा शाळा सरळ सकाळी ७.४५ वाजता सुरू करून नेहमीच्या वेळेत सोडण्यात सांगाव्यात, अशी सूचना सरकारने शालान्त मंडळाला केली असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली.
वेळ कशी साधणार?
दरम्यान, शाळांना या निर्देशानुसार, दररोजच्या तासिकांच्या वेळांचे नियोजन करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत लवकर बोलवायचे असेल तर त्यानुसार बालरथ अथवा विद्यार्थी वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. किंवा संध्याकाळच्या सत्रात वेळ वाढवून त्यानुसार तासिकांचे समायोजन करावे लागेल. दोन्हीपैकी एक पर्याय निवडावा लागणार असल्याने शैक्षणिक वर्तुळातून कसा निर्णय घेतला जाईल, याविषयी पालक तसेच विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.