लोकमत न्यूज नेटवर्कवास्को: लॉकडाऊन मुळे गोव्यात अडकलेल्या विदेशी पर्यटकांना गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून त्यांच्या मायदेशी पाठवण्याचे काम सद्या जोरात चालू आहे. बुधवारी (दि.१) दाबोळी विमानतळावर आलेल्या दोन खास विमानातून ६४७ पर्यटकांना जर्मनी व फीनलँड येथे त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले. कोरोनाची पसरण रोखण्यासाठी भारतात २५ मार्च पासून लॉकडाऊन केल्यानंतर गोव्यात अडकलेल्या विदेशी पर्यटकांपैंकी १५७७ विदेशी पर्यटकांना गोव्यातून खास विमानाने त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आलेले आहे. लॉकडाऊन मुळे गोव्यात अजूनही काही विदेशी पर्यटक अडकून राहीलेले असून त्यांना मायदेशी पाठवण्याकरिता लवकरच आणखीन काही खास विमाने येणार असल्याची माहीती दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी दिली.बुधवारी (दि. १) सकाळी ७ च्या सुमारास दाबोळी विमानतळावर आलेल्या ‘फिनएअर’ च्या खास विमानाने ३३३ विदेशी पर्यटकांना हेलसिंकी, फिनलँड येथे त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले. यानंतर सकाळी ११ च्या सुमारास दाबोळी विमानतळावर दाखल झालेल्या ‘एअर इंडीया’ च्या खास विमानातून ३१४ प्रवाशांना फॅ्रकफर्ट - जर्मनी येथे त्यांच्या राष्ट्रात पाठवण्यात आले. दाबोळी विमानतळावर बुधवारी उशिरा रात्री अन्य एक खास विमान येणार असून या विमानातून गोव्यात अडकलेल्या पॅरिस राष्ट्रातील नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येणार असल्याची माहीती दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक यांनी दिली. कोरोना विषाणूची पसरण रोखण्यासाठी संपूर्ण भारतात २५ मार्च पासून २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आलेला असून गोव्यात सुद्धा याचे कडक रित्या पालन करण्यात येत आहे. यामुळे दाबोळी विमानतळावरून होणारी राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय विमानसेवा सद्या रद्द करण्यात आलेली आहे. लॉकडाऊन लागू केल्यानंतर गोव्यात विविध राष्ट्रातील अडकून राहीलेल्या विदेशी पर्यटकांना खास विमानाने त्यांच्या मायदेशी पाठवण्याचे काम दाबोळी विमानतळावरून सुरू करण्यात आलेले आहे. लॉकडाऊन नंतर अजून पर्यंत दाबोळी विमानतळावरून ८ खास विमानांनी १५७७ विदेशी पर्यटकांना त्यांच्या मायदेशी पाठवलेले असून यात ९ चिमुकल्यांचा समावेश असल्याची माहीती दाबोळी विमानतळावरील सूत्रांनी दिली.लॉकडाऊन नंतर गोव्यात अडकून राहीलेल्या विदेशी पर्यटकांना कशा प्रकारे त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येणार याबाबत माहीती घेण्यासाठी काही पत्रकारांनी तीन दिवसापूर्वी दाबोळी विमानतळाचे संचालक गगन मलिक यांना संपर्क केला होता. यावेळी त्यांनी अजून गोव्यात सुमारे दोन हजार विदेशी पर्यटक अडकून राहील्याची माहीती देऊन त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी ७ खास विमाने लवकरच गोव्यात येणार असल्याचे कळविले होते. यानंतर मंगळवारी व बुधवारी अशा दोन दिवसातच दाबोळी विमानतळावर पाच खास विमाने येऊन रशिया, जर्मनी, इस्त्राईल अशा विविध देशातील पर्यटकांना त्यांच्या मायदेशी घेऊन रवाना झाली. मागच्या दोन दिवसात दाबोळी विमानतळावरून १०९७ विदेशी पर्यटकांना खास विमानाने त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आलेले आहे. गोव्यात अजून सुमारे ९०० विदेशी पर्यटक असून लवकरच त्यांना त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी दाबोळी विमानतळावरून उचित पावले उचलण्यात येणार असल्याची माहीती विमानतळावरील सूत्रांनी दिली.
आज ६४७ विदेशी पर्यटकांना मायदेशी पाठविले; उर्वरितांचीही लवकरच रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 8:09 PM