म्हापसा - नाताळ सण व पार्ट्या असे समिकरण झालेल्या गोव्यात आजपासून पुढील किमान आठ दिवस गोव्यात विविध ठिकाणी पार्ट्यांचा धडाका लागणार आहे. खासकरुन देशी-विदेशी पर्यटकांना टार्गेट करुन आयोजित करण्यात येणाऱ्या या पार्ट्यांना पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या क्लृप्त्या आयोजकांनी अवलंबल्या आहेत.
येशू ख्रिस्ताच्या जन्मा निमित्त २४ रोजी मध्यरात्री चर्चीत प्रार्थना सभा संपन्न झाल्यानंतर सुरु होणारा पार्ट्यांचा धडाका नवीन वर्षाच्या आगमनापर्यंत सुरु राहणार आहे. यातील बऱ्याच पार्ट्यांचे आयोजन सततपणे पाच दिवसांसाठी सुद्धा करण्यात आलेले आहे. मात्र बहुतेक पार्ट्या नाताळाच्या दिवशी २५ रोजी आयोजित केल्या जातात. बार्देस तालुक्यातील कांदोळी येथील किनाऱ्यापासून आयोजित होणाऱ्या या पार्ट्या पेडणे तालुक्यातील केरी इथल्या किनाऱ्यापर्यंत आयोजित केल्या जात आहेत. डिसेंबर महिन्यातील शेवटचा आठवडा या पार्ट्यांचा आठवडा ठरलेला आहे.
दर वर्षी गोव्यात लाखोंनी पर्यटक नाताळ तसेच नवीन वर्ष साजरे करण्यासाठी येत असतात. त्यामुळे हा काळ सर्व हॉटेल व्यावसायिकांसाठी हाऊसफुल्ल असा मानला जातो. या पार्ट्यांच्या जाहीरात बाजीसाठी सामान्य माध्यमांचा वापर न करता सोशल मीडियासारख्या माध्यमाचा तसेच ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जात आहे. जाहिरातींच्या आकर्षणाचा एक भाग म्हणून किनाऱ्यांचा, चंद्राचा तसेच रात्रीच्या वातावरणांचा मोठ्या खुबीने वापर केला आहे. पार्ट्यांची तिकिट विक्री सुद्धा आॅनलाइन पद्धतीने केली जात आहे. दिवसाप्रमाणे तिकिटचे दर लागू केले आहेत. एकाच दिवसासाठी पार्ट्यात येणाऱ्यांना वेगळा दर तर सततपणे येणाऱ्यांना आकर्षक सवलती बरोबर वेगळा दर तसेच इतर सुविधा लागू केल्या आहेत. काही पार्ट्यांना प्रवेश मोफत ठेवून इतर खाद्य तसेच पेयावर जास्त किंमती लावून प्रवेशाची किंमत वसूल करुन घेतली जाते.
काही ठिकाणी बॅनर्सचा वापर करुन सुद्धा जाहीरात करण्यात आली आहे. हे बॅनर्स जास्त प्रमाणावर सर्वत्र न लावता संबंधीत परिसरात लावण्यावर भर दिला जातो. बहुतेक बॅनर्स इंग्रजीतून असले तरी त्यातील बरेच बॅनर्स येणाऱ्या विदेशी पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी विदेशी भाषेचा वापर करुन सुद्धा लावले जातात. खास करुन गोव्यात रशियन पर्यटक जास्त प्रमाणावर येत असल्याने रशियन भाषेतले बॅनर्स लावले जातात. आयोजित होणाऱ्या पार्ट्या हॉटेलात, क्लबात, मोकळ््या जागेत उघड्यावर काही किनाऱ्यावरील शॅकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पार्ट्यांचे शेवटचे दिवस हे जास्त गर्दीचे दिवस मानले जातात. हे लक्षात घेऊन सुद्धा जाहिरातबाजी केली जाते.
काही पार्ट्यांचे आयोजक गोव्याबाहेरील किंवा विदेशी असतात. अशा पार्ट्यांना स्थानिक प्रशासनाकडून पार्ट्यांच्या आयोजनात आडकाठी येवू नये यासाठी संबंधीत भागातील स्थानिकांना हाताशी धरुन त्याचे आयोजन केले जाते. काही वेळा होत असलेला विरोध डावलण्यासाठी त्यांना सुद्धा संतुष्ठ करुन ठेवण्याचे प्रयत्न केले जातात. त्यामुळे बिनधक्तपणे या पार्ट्या आयोजल्या जातात. पार्ट्यांसाठी लागणारी यंत्रणा तसेच सुरक्षा व्यवस्था सुद्धा स्थानिक पातळीवरुन किंवा खासगी संस्थेकडून वापरली जाते. काही जागृत सामाजिक संघटना अशा पार्ट्यांना विरोध करीत असतात; पण होत असलेला विरोध गृहीत धरला जात नाही.
पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी किंवा मोठ्या प्रमाणावर आयोजित होणाऱ्या पार्ट्यांना देश विदेशातील नामांकित डिजेना त्यासाठी आमंत्रीत करण्यात येत. डिजे सोबत नृत्याचेही आयोजन केले जाते. रात्री दहानंतर ध्वनी प्रदूषणावर मर्यादा असली तरी या मर्यादेला बगल देऊन पहाटेपर्यंत संगीत सुरुच ठेवले जाते. काही आयोजक मात्र स्वत:ला कायद्याच्या बडग्यातून वाचवण्यासाठी चार भिंती आडून कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात. नाताळाचे दिवस असल्याने पोलिसांकडून कारवाईत सुद्धा शिथीलता दाखवली जाते.