पणजी : बेकायदा खनिज वाहतुकीच्या निषेधार्थ कावरेवासीय आज सोमवारी सकाळी १0.३0 वाजता शहरात मोर्चा काढून खाण खात्यावर धडक देणार आहेत. तसेच हे ग्रामस्थ संपूर्ण दिवस येथील आझाद मैदानावर धरणे धरणार आहेत. खनिज वाहतूकविरोधी चळवळीतील कार्यकर्ता रवींद्र वेळीप यांनी ही माहिती दिली. ई-लिलावातील खनिजाच्या नावाखाली बेकायदा खनिज वाहतूक चालू असल्याचा आरोप आहे. याआधी ग्रामस्थांनी वेळोवेळी खाण खात्याला पत्र लिहून गैरकारभाराबद्दल माहिती दिलेली आहे. मात्र, त्यावर कोणतेही पाऊल सरकारने उचलले नसल्याने त्याचा जाबही ग्रामस्थ विचारणार आहेत. खनिज चोरीचा हा प्रकार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कावरेवासीयांची सहकार तत्त्वावर स्वत: खाण चालवण्याची तयारी आहे. त्यासाठी साधना बहुउद्देशीय सहकारी संस्था या नावाने नोंदणीसाठीही अर्ज केलेला आहे; परंतु अजून नोंदणी केली जात नसल्याने मुख्यमंत्र्यांनी सहकार निबंधकांना योग्य ते निर्देश द्यावेत व ई-लिलावाच्या खनिजमालाची वाहतूक करण्याची परवानगी या संस्थेला द्यावी, ई-लिलावाच्या नावाखाली चालू असलेली बेकायदा खनिज वाहतूक त्वरित थांबवणे, सडा कारागृहात रवींद्र वेळीप यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करावी, आदी मागण्या आहेत. (प्रतिनिधी)
कावरेवासीयांचा आज मोर्चा
By admin | Published: April 18, 2016 2:11 AM