पणजी : गोव्याच्या रस्त्यावरून मंगळवारी (30 जानेवारी ) पहिली इलेक्ट्रीक बस धावली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी कदंब वाहतूक महामंडळाचे चेअरमन कालरुस आल्मेदा व वरिष्ठ अधिकारी घाटे यांच्यासह कदंबच्या अन्य अधिका-यांसोबत इलेक्ट्रीक बसमधून प्रवास करण्याचा अनुभव घेतला. पणजी ते बांबोळीपर्यंत या पहिल्यावहिल्या इलेक्ट्रीक बसने मुख्यमंत्री व इतरांना घेऊन फेरफटका मारला.
हैद्राबादमधील गोल्डस्टोन इन्फ्राटेक लिमिटेड कंपनीने या इलेक्ट्रीक बसची निर्मिती केली आहे. एका बसची किंमत एकूण 2.45 कोटी रुपये आहे. कदंब वाहतूक महामंडळाला कंपनीने ही बस चालविण्यासाठी दिली आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी मंगळवारी पणजीतील कदंब बस स्थानकावर या बसगाडीचे उद्घाटन केले. त्यानंतर ही बसगाडी प्रत्यक्ष कशी चालते ते पाहण्याच्या हेतूने मुख्यमंत्र्यांनी पत्रकांनाही सोबत घेऊन फेरफटका मारला. या बसगाडीला इंधन नाही. 324 केव्ही क्षमतेची बॅटरी आहे. गाडीतच ही बॅटरी चार्ज करून मिळते. धूर येत नाही. इंजिन नसल्याने गाडी मेन्टेन करणो सोपे आहे.
मुख्यमंत्री पर्रीकर यांनी बसचा अनुभव घेतल्यानंतर पत्रकारांना सांगितले, की पुढील वर्षी गोव्याला 5 0ते 100 इलेक्ट्रीक बसगाडय़ांची गरज आहे. मंगळवारी रस्त्यावर दाखल झालेली इलेक्ट्रीक बसगाडी कशी चालते ते पाहिले जाईल व लगेच सरकार निविदा जारी करून बसगाडय़ा मागविल. गोव्याच्या रस्त्यांवर अधिकाधिक इलेक्ट्रीक व बायोगॅसवर आधारित बसगाड्या धावतील याची काळजी सरकार घेईल. कारण आम्हाला प्रदूषणापासून मुक्ती हवी आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, की कदंब वाहतूक महामंडळ इलेक्ट्रीक बसगाडय़ांची स्वत: खरेदी करणार नाही. बस निर्मिती करणा:या कंपन्यांशी आम्ही करार करू व त्या कंपन्याच गोव्यातील चालकांना घेऊन गोव्यात बसगाडय़ा चालवतील. प्रती किलोमीटर 55 ते 60 रुपये असा दर इलेक्ट्रीक बसगाडय़ांच्या वाहतुकीवर सरकार खर्च करील. गोव्यातील चालकांना संबंधित कंपन्या आवश्यक प्रशिक्षण देतील. इलेक्ट्रीक बसगाडी ब:यापैकी चालते असा अनुभव आपल्याला तरी आला.बायोगॅसवर चालणारी एक बसगाडी दाखल झाली आहे. या बसला आवश्यक परवानगीही आता मिळाली आहे. विविध प्रमुख मार्गावर ही बसगाडी प्रवासी वाहतूक करेल.
दरम्यान, बांबोळी येथील कुजिरा शैक्षणिक प्रकल्पात असलेल्या सर्व विद्यालयांतील विद्याथ्र्याच्या वाहतुकीसाठी कदंब वाहतूक महामंडळाने मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते पंधरा बसगाड्यांचे उद्घाटन केले. पणजी ते बांबोळी व बांबोळी ते पणजी असा प्रवास या बसगाड्या करतील.