- सुशांत कुंकळयेकर
मडगाव: खाण बंदीमुळे आर्थिक मंदीच्या गर्तेत आलेल्या गोवा सरकारने स्वत:ला सावरण्यासाठी अबकारी करात वाढ केली असली तरी या वाढीमुळे गोव्याच्या पर्यटन व्यवसायावर विपरित परिणाम होणार असल्याची भीती पर्यटन व्यावसायिकांकडून केली जात आहे. या वाढीमुळे गोव्यातील दारुचे दर वाढणार असल्यामुळे आता देशी पर्यटकही गोव्याकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे.यंदाच्या अर्थसंकल्पात दारुवरील अबकारी करात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली असून अबकारी परवाना दरातही मोठ्या प्रमाणावर वाढ केली असून त्याचा फटका सर्वसामान्य वातानुकूलीत बार व रेस्टॉरन्टसना बसणार आहे. एकीकडे थॉमस कुकसारखी आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल एजन्सी बंद झाल्याने गोव्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकामध्ये निम्म्याने घट झाली आहे. अशा परिस्थितीत गोव्यात मिळणाऱ्या स्वस्त दारुच्या आकर्षणापोटी जे देशी पर्यटक गोव्यात यायचे तेही कमी होणार अशी भीती व्यक्त केली जाते.अखिल गोवा लिकर ट्रेडर्स संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांनी स्पष्टपणे ही भीती व्यक्त केली. ते म्हणाले, उत्तर भारतात राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली व चंदीगड येथे गोव्यापेक्षाही कमी दरात दारु मिळते. अशा परिस्थितीत गोव्यातील दारुचे दर वाढले तर पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवतील. या दरवाढीमुळे सरकारला 40 कोटींचे अतिरिक्त उत्पन्न मिळणार असा सरकारचा अंदाज असला तरी प्रत्यक्षात या दरवाढीमुळे महसुलावरही विपरित परिणाम होणार असे मत त्यांनी व्यक्त केले.टीटीएजी या पर्यटन व्यावसायिकांच्या संघटनेचे सचिव व हॉटेल व्यावसायिक जॅक सुखीजा यांनीही परवाना शुल्कात जी वाढ केली आहे त्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिक अडचणीत येतील. या शुल्काची वसुली किचकट पद्धतीची असल्याने व्यावसायिकांसाठी ती अधिकच डोकेदुखी ठरेल असे मत व्यक्त केले.आर्थिक विश्र्लेषक असलेले अर्थशास्त्रचे प्राध्यापक डॉ. मनोज कामत यांनी याबद्दल आपले मत व्यक्त करताना, सरकारचा खनिज उद्योगातून येणाऱ्या महसुलाचा स्रोत आटल्यावर पर्यटन व्यवसायातून ते ही तूट भरुन काढतील अशी अपेक्षा होतीच. मात्र असे जरी असले तरी दरवाढीचा हा वेळ चुकीचा आहे. मुळातच गोव्यातील पर्यटन महागडे आहे. अशातच ज्या स्वस्त दारुच्या आकर्षणापोटी गोव्यात जे पर्यटक येत होते त्यांना महागातील दारु प्यावी लागल्यास ते गोव्याकडे पाठ वळवतील आणि त्यामुळे खनिज उद्योगापाठोपाठ आता पर्यटन उद्योगातही मंदी येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
रस्त्यावर दारू पिण्याचे प्रमाण वाढणारअबकारी शुल्क आणि परवाना शुल्क वाढल्यामुळे निश्र्चितच दारुची किंमत वाढणार आहे. अशा परिस्थितीत गोव्यात येणारे पर्यटक हॉटेलात जाऊन महाग दारु पिण्याऐवजी उघडय़ावर होलसेल दुकानात मिळणारी स्वस्तातली दारु पिण्यावर भर देतील. परिणामी रस्त्यावर दारु पिऊन दंगा करण्याचे प्रकार वाढणार आहेत. परवाना शुल्क वाढीमुळे यापूर्वीच तारांकित हॉटेलांचे कंबरडे मोडले होते. हॉटेलात रहाणारे पर्यटक बीचवरील श्ॉकमध्ये जाऊन दारु पिणो पसंत करत होते. आताच्या दरवाढीने हॉटेलासाठी परिस्थिती अधिकच कठीण होईल.सावियो मेसियस, टीटीएजीचे अध्यक्ष