पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे स्वत:च्या बुद्धीने विचारच करत नाहीत. त्यामुळेच 144 कलम लागू करून सरकारने घोळ केला व त्याचा मोठा फटका गोव्याच्या पर्यटनाला बसला आहे, अशी टीका अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी शनिवारी येथे केली. मुख्यमंत्र्यांकडे योग्य अशा नेतृत्वाची क्षमताच नसल्याने सध्या प्रशासनाचा बट्टय़ाबोळ झाला आहे व राज्य कर्जात अडकले आहे, असेही खंवटेम्हणाले.
खंवटे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्याला दहशतवादापासून धोका असल्याने कलम 144 लागू करण्यात आल्याचे सरकारने अगोदर जाहीर केले होते. आता मुख्यमंत्री म्हणतात की- दहशतवादाचा धोकाच नाही व त्यामुळे कलम 144 मागे घेण्याचा विचार ते करतात. पाचच दिवसांत दहशतवादाचा धोका टळला काय असा प्रश्न येतो. नीट अभ्यास व विचार न करताच मुख्यमंत्री वागत असल्याने परिणाम पर्यटन क्षेत्रला भोगावे लागत आहेत.
माझे काही मित्र दरवर्षी कार्निव्हलवेळी गोव्यात येतात. त्यांनी यावेळी दहशतवादाचा धोका असल्याने व कलम 144 लागू झाल्याने आपण येत नाही असे सांगितले. मुख्यमंत्र्यांनी नुकताच अर्थसंकल्प मांडला व राज्याचा 353 कोटींचा शिलकी म्हणजे अतिरिक्त महसुलाचा अर्थसंकल्प असल्याचे सांगितले. मात्र आता पुन्हा सरकार कर्ज घेऊ लागले आहे. नुकतेच शंभर कोटींचे कर्ज घेतले गेले. सरकार कर्ज घेऊन ते पूर्वीच्याच कर्जावरील व्याज भरण्यासाठी तसेच कर्मचा:यांना वेतन देण्यासाठी वापरत आहे. राज्याचा महसुल कसा वाढवावा याचे कोणतेही नवे मार्ग मुख्यमंत्र्यांना सूचत नाही, असे खंवटे म्हणाले.
माविनच्या भावाला वाचवतात
कायदा व सुव्यवस्था पूर्ण बिघडली आहे. मुख्यमंत्री सध्या प्रकाश नाईक मृत्यू प्रकरणात मंत्री माविन गुदिन्हो यांच्या भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रकाशचा खून झालाय असा नवा कोन पोलिसांनी दिला व चौकशी भलत्याच दिशेने नेली आहे. विल्सन गुदिन्हो या प्रकरणातून सहीसलामत सुटावा यासाठी सरकारची ही धडपड आहे, असा आरोप खंवटे यांनी केला. बागा येथे ला कालिप्सो हॉटेलमध्ये गुंड घुसतात व पर्यटकांना, कर्मचाऱ्यांना ओलीस धरतात.
पोलिस तिथेही कमी पडले. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या आरक्षण प्रक्रियेतही मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप सुरू आहे. महालक्ष्मी बंगल्यावर बसून विरोधकांच्या ताब्यातील जिल्हा पंचायत मतदारसंघांचे आरक्षण बदलण्याचे काम सुरू आहे, असे खंवटे म्हणाले. अधिका:यांनी मुख्यमंत्र्यांकडे आरक्षणाविषयी कोणती फाईल पाठवली होती, त्याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. एकदा आरक्षण बदलून आल्यानंतर मग आम्ही सगळी स्थिती जाहीर करू, असाही इशारा खंवटे यांनी दिला.