पणजी : भारतीय बनावटीच्या विदेशी दारूवर गोवा सरकारने अर्थसंकल्पातून कर वाढविल्यामुळे गोव्यात पर्यटन व्यवसायालाही धक्का बसेल अशी भीती विरोधी आमदारांकडून तसेच मद्य व्यवसायिकांकडून व्यक्त होत आहे. मात्र गोवा सरकारच्या अधिकाऱ्यांनी अशी शक्यता फेटाळून लावली आहे.खाण उद्योगानंतर पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. वार्षिक पन्नास लाखांपेक्षा जास्त पर्यटक गोव्याला भेट देतात. मद्यपान हे गोव्याच्या पर्यटनाचे एक आकर्षण मानले जाते. गोव्यात येऊन काजू फेणीसह अन्य मद्याचा लाभ पर्यटक घेतात. मात्र गोव्यात प्रथमच काजू फेणीवर कर लागू झाला आहे. वाईनलाही अबकारी डय़ुटी लागू झाली आहे. मद्य व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांच्या मते महाराष्ट्रात देखील वाईनवर कर नाही पण गोव्यात तो लागू झाल्याने पर्यटनावर परिणाम होईलच.उत्तर भारतातील राज्यांमध्ये गोव्यापेक्षा कमी दराने मद्य उपलब्ध होते. फक्त महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये दारू गोव्यापेक्षा महाग आहे. मात्र या दोन राज्यांपेक्षा उत्तर भारतातूनच जास्त पर्यटक गोव्यात येतात. मध्यावरील करवाढीचा फटका पर्यटन धंद्याला बसेल, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व आमदार विजय सरदेसाईही म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी मात्र मद्यावरील करवाढ योग्य आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
करवाढीमुळे गोव्यात पर्यटन धंद्याला धक्का शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 8:36 PM