पणजी : आचारसंहिता काळात रात्री ११ नंतर मद्यबंदीचे निर्बंध शिथिल करुन व्यावसायिकांना मुभा द्यावी, अशी मागणी अखेर पर्यटन खात्याने निवडणूक आयोगाकडे केली आहे. निर्बंधांमुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला आहे. बार आणि रेस्टॉरण्ट मालकांनी या निर्बंधांवर फेरविचार केला जावा अशी विनंती करणारे निवेदन पर्यटन खात्याला सादर केले होते. उन्हाळी सुट्टी सुरू झाली असून देशी पर्यटक गोव्यात येऊ लागले आहेत. गूड फ्रायडेची सुट्टी विकएंडला सलग लागून आल्याने पुढील चार-दिवस पर्यटकांचा प्रचंड ओघ राहणार आहे. त्यानंतर महिनाभर देशी पाहुण्यांची संख्या लक्षणीय असणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत विदेशी पाहुण्यांची संख्या कमी असते. परंतु देशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. किनाऱ्यांवर तसेच अन्य पर्यटनस्थळांवर गर्दी उसळलेली असते. बार तसेच किनाऱ्यांवरील शॅकमध्ये रात्री ११ नंतर मद्य बंद करण्यात आल्याने व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे. आचारसंहिता २३ मे नंतरच संपणार आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बार आणि रेस्टॉरण्ट मालकांच्या शिष्टमंडळाने चालू आठवड्याच्या प्रारंभीच पर्यटन संचालक संजीव गडकर यांची भेट घेऊन निर्बंध शिथिल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, पर्यटन खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी हा विषय केंद्रीय आयोगाकडे नेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिलेले आहे.
गोव्यातील मद्यबंदी शिथिल होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 7:52 PM