काशिराम म्हांबरे, म्हापसा: पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकाला स्टंटबाजी पडली महागात. हळदोणा-खोर्जुवे येथील केबल स्टेड पूलावर बेजबाबदारपणे गाडीच्या टपावर बसून स्टंटबाजी करणाऱ्या तेलंगणा येथील पर्यटका विरोधात म्हापसा पोलिसांनी गुन्हा नोंद करुन त्याला अटक केली आहे.
किनाऱ्यावर पाण्यात वाहन चालवणे, दुचाकीवरून धोकादायक स्टंट करणे, दारुच्या नशेत वाहन चालवणे यासारख्या पर्यटकांकडून केल्या जाणाऱ्या प्रकाराची गंभीर दखल घेतली जाणार आहे. अशा प्रकारांवर नियंत्रणासाठी सक्त कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आलेला आहे.
उपअधिक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार या संबंधीत व्हिडीयो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेला संशयित सनाडोबोयना राजय्या याच्या विरोधात भा.दं. संच्या कलम २७९, ३३६, तसेच मोटार वाहन कायदा १९२ अंतर्गत बेजबाबदारपणे वाहन चालवणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करून मानवी जीवन धोक्यात आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टंटसाठी वापरण्यात आलेली गाडी सुद्धा ताब्यात घेण्यात आली आहे. पुढील तपास कार्य निरीक्षक सिताकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले आहे.