पणजी - ‘थॉमस कूक’ ट्रॅव्हल कंपनी बंद पडल्याने गोव्याच्या पर्यटनावर आघात झाल्याच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडच्या पर्यटकांना गोव्यात आणण्यासाठी एअर इंडियाने चार्टर विमानांची सोय करावी, या मागणीचा पाठपुरावा करण्यास राज्य सरकार कमी पडले आहे. आगामी नाताळ, नववर्षाच्या निमित्त ब्रिटिश पर्यटकांची एरव्ही गोव्यात धूम असते, परंतु यावेळी या पर्यटकांच्या संख्येवर परिणाम होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चार्टर सेवा सुरू करण्यास एअर इंडियाने उत्सुकता दाखवलेली नाही. सरकारही याबाबत पाठपुरावा करण्यास अपयशी ठरले आहे, यामुळे हॉटेल उद्योजक, टुरिस्ट टॅक्सीचालक तसेच गोव्यातील अन्य पर्यटन व्यावसायिक मात्र धास्तावले आहेत. ब्रिटिश पर्यटक बंद झाल्यास मोठा आर्थिक फटका गोव्याला बसणार आहे. ‘थॉमस कूक’ ही सर्वात जुनी टुरिस्ट ट्रॅव्हल कंपनी गेली 25 ते 30 वर्षे ब्रिटिश पर्यटकांना गोव्यात आणत होती. गोव्याला भेट देणाऱ्या विदेशी पर्यटकांमध्ये ब्रिटिश पाहुण्यांचा दुसरा क्रमांक लागतो. सर्वाधिक पर्यटक रशियातून येत असतात.
‘थॉमस कूक’ दर आठवड्याला सात चार्टर विमानांमधून कमीच ते 2100 ब्रिटीश पर्यटक गोव्यात आणत होती. सर्वाधिक खर्च करणारे हाय एंड टुरिस्ट म्हणून या पर्यटकांकडे पाहिले जाते, त्या मनाने रशिया किंवा अन्य देशांमधून येणारे पर्यटक कमी खर्च करतात आणि व्यावसायिकांना त्यांच्याबद्दल जास्त अपेक्षा नसते. ब्रिटिश पर्यटक भारतात आले की, एकाच ठिकाणी किंवा एकाच हॉटेलात राहतात. खरा आनंद लुटण्यासाठी येणारे हे पर्यटक रिलॅक्स मूडमध्ये आपली सुट्टी येथे मजेत घालवत असतात आणि मोठ्या प्रमाणात ते खर्चही करीत असतात, हे उत्पन्न बुडणार आहे.
खात्याचे वेगवेगळे उपक्रम
दरम्यान, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जायंट व्हील, हेरिटेज बोटसेवा असे वेगवेगळे नवे उपक्रम सुरू करण्यासाठी पर्यटन खात्याने पावले उचलली आहेत. काही सेवांच्या बाबतीत निविदाही मागवल्या असून 6 डिसेंबरपर्यंत या निविदा सादर करण्यास सांगितले आहे. काही बाबतीत एकापेक्षा जास्त वेळा निविदा काढलेल्या आहेत. मात्र प्रतिसाद समाधानकारक मिळालेला नाही. काही सेवा पर्यटन खात्याने सुरू केल्या परंतु स्थानिकांच्या विरोधामुळे त्या बंद कराव्या लागलेल्या आहेत. मांद्रे येथे मोटराइझ्ड पॅराग्लायडिंग सुरू केले, परंतु स्थानिकांच्या विरोधामुळे अवघ्या काही दिवसातच ते बंद करावे लागले. हेरिटेज बोट सेवेसाठी एजन्सी नेमली होती परंतु त्याची सेवा समाधानकारक नाही. या वर्षी पर्यटन खात्याने मयें येथे बंगी जंपिंग सुरू केले आहे. पूर्वी बंगी जंपिंग हणजूण येथे होते, ते आता मयें येथे हलविण्यात आले आहे. जुने गोवे येथे हेलिपॅडची दुरुस्ती सुरू असून तेथून पर्यटकांसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू केली जाईल. समुद्रात उतरणारे सी प्लेन, पाण्यात आणि जमिनीवर चालणारी उभयचर वाहने आदी उपक्रम मात्र सरकारच्या अनास्थेमुळे रखडले आहेत.
अखिल गोवा मालक शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रूझ कार्दोझ यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक गोष्टी आवश्यक होणे आवश्यक आहेत.त्याचप्रमाणे रस्ते, वीज, पाणी आदी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होणेही गरजेचे आहे.