पणजी - रुपेरी वाळूसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यातील समुद्रकिना-यांवर अलिकडे बेवारस गुरे आणि कुत्र्यांचा संचार वाढला आहे. मोठया संख्येने गुरे फिरत असल्याने काहीवेळा पर्यटक हैराण होतात असा अनुभव सध्या येत आहे. पूर्ण किनारपट्टीत गुरे असत नाहीत पण किनारपट्टीतील काही जगप्रसिद्ध पर्यटन ठिकाणांवर गुरे फिरत असतात. दक्षिण गोव्यातील माजोर्डा येथे तर चांगल्या समुद्राच्या ठिकाणी गुरे आढळून आल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली. उत्तर गोव्यात वागातोर, हरमल, आश्वे, मांद्रे, मोरजी, हणजुणा, कांदोळी, बागा, सिकेरी व कळंगुट असे सागरकिनारे आहेत.
तिथे कधी मोकाट कुत्रे तर कधी गुरे फिरताना आढळतात. किना-यावरील कचरा खाण्यासाठी गुरे व कुत्रे येत असतात. यापासून पर्यटकांना त्रास होतो. जगभरातून येणा-या पर्यटकांच्या मनात यामुळे नकारात्मक प्रतिमा ठसते. किना-यांवर सध्या शॅक (पर्यटन गृहे) आहेत. शॅक व्यवसायिकांनाही भटकी गुरे व कुत्र्यांचा त्रस होतो. पर्यटन खात्याने तसेच स्थानिक ग्रामपंचायतींनी याविरुद्ध उपाययोजना करावी अशी मागणी शॅक व्यवसायिक करतात. काही पर्यटक किना-यावरच अन्न पदार्थ खातात.
काहीजण अर्धवट पदार्थ तिथेच टाकून देतात. काही देशी पर्यटक किना-यांवरच स्वयंपाक करतात. यामुळे कुत्रे व भटक्या गुरांचा संचार वाढला आहे, असे काही पंच सदस्यांचे म्हणणो आहे. दक्षिण गोव्याच्या किना-यांवर गुरे फिरत असल्याची छायाचित्रे काहीजणांनी सोशल साईटवरही टाकली आहे व शासकीय यंत्रणोवर टीका केली आहे.
दरम्यान, र्पीकर सरकार अधिकारावर आल्यानंतर सर्वप्रथम पर्यटन खात्याने किना-यांवर बेकायदा धंदा करणा-यांविरुद्ध कारवाई सुरू केली होती. यामुळे खळबळ उडाली होती. किना:यावर फिरून जे विविध प्रकारच्या वस्तू विकतात त्यांनाही अटकाव केला होता. मात्र आता हे सगळे नव्याने सुरू झाले आहे. भिकारी, बालमजुर यांच्यापासूनही किना-यांवर पर्यटकांना उपद्रव होत आहे.
खाद्य पदार्थ विकणारेही किना-यांवर फिरतात. गोव्यातील काही समुद्रकिनारे खूपच सुंदर आहेत. सुर्यास्ताचे विहंगम दृश्य डोळ्य़ात साठवून ठेवण्यासाठी हजारो पर्यटक सायंकाळी किना:यांवर येत असतात. अनेकजण समुद्रस्नानाचा आनंद घेत असतात. अशावेळी भिकारी, गुरे, कुत्रे वावरत असल्याचे किना-यावर पाहून काही पर्यटकांचा हिरेमोड होतो. अपेक्षाभंग होतो.