पूजा प्रभूगावकरपणजी :
गोव्यात जी २० परिषद होणार असून त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी पणजी बसस्थानक परिसरात रस्त्यांच्या हॉटमिक्सिंगचे काम हाती घेतल्याने पणजी, पर्वरी भागात वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या. यामुळे दहावीच्या परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि पर्यटकांच्या गाड्याही अडकून पडल्या. पणजीतील चर्च स्क्वेअर, ओल्ड गोवा चर्च, कवळे, मंगेशी, कळंगुट, कांदोळी भागात जाण्यासाठी पर्यटक हाच रस्ता वापरतात.
या वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांचा पत्ताच नसल्याने वाहनचालक मिळेल त्या अंतर्गत मार्गाने आपली वाहने रेटत होते. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवरही ट्रॅफिक जॅमचा अनुभव लोकांना आला. इतर गाड्या घुसल्या म्हणून मागाहून येणाऱ्या पर्यटकांनी गाड्या वळविल्याने त्यांना आपण नेमके कोठे पोचलोत याचा अंदाज न आल्याने त्यांचा गोंधळ उडाला.
रस्त्यावरील या अराजकाबद्दल वाहनचालक आणि पर्यटकही नाराज झाले. दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर जाण्यास उशीर झाल्याने काही केंद्रांवर मुलांना वाढीव वेळ देण्यात आला. दोन किलोमीटरच्या मार्गावर दोन तास वाहतूक कोंडीत वाहने अडकली.