पणजी : महाराष्ट्रात कोविडग्रस्तांची संख्या वाढत आहे पण गोव्यात अजून खबरदारीचे उपाय सुरू झालेले नाहीत. सीमांवर अजून वेगळा बंदोबस्त नाही. महाराष्ट्राच्या विविध भागांतून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना अजून तरी गोव्यात मुक्त प्रवेश आहे. सीमेवर त्यांची कुणी अडवणूक करत नाही.
महाराष्ट्रातील हजारो पर्यटक शनिवार व रविवारी गोव्यात असतात. मुंबई, पुणे, कोल्हापुर व महाराष्ट्रातील अन्य भागांतील हजारो पर्यटकांचा विकेण्ड गोव्यात होत असतो. गोव्यात कोविडग्रस्तांची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे गोवा राज्य हे कोविडबाबत देशभरातीलच पर्यटकांना खूप सुरक्षित वाटते. मात्र गोव्यात महाराष्ट्रातून जे पर्यटक येत आहेत, त्याविषयी गोमंतकीयांत चिंता व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील कोविड स्थितीच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या सीमांवर काळजी घ्यावी लागेल याची कल्पना येथील शासकीय यंत्रणेलाही येत आहे. मात्र, सध्या कुठेच कुणाची कोविडच्या दृष्टीकोनातून तपासणी होत नाही. दरम्यान, आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांना लोकमतने विचारले असता, आम्हाला काळजी घ्यावी लागेल एवढेच ते म्हणाले.